नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून सुटू नये : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

खामगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्या. त्यांनी यांनी आज कोलोरी, पिंपरी गवळी येथे नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, तहसीलदार अतुल पाटोळे आदी उपस्थित होते.

 

केंद्रीय राज्यमंत्री जाधव म्हणाले, खामगाव तालुक्यातील 11 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टी झाली नसलेल्या पारखेड मंडळातील ज्या भागात जास्त पाऊस झालेला आहे, तेथीलही पंचनामे करण्यात यावे. स्थानिक पातळीवर पंचनामे करताना शेतजमीन काढून जाणे आणि शेतामध्ये पाणी साचणे, पिकांचे नुकसान याचे वेगवेगळे पंचनामे करण्यात यावे. तालुक्यात 838 हेक्टर जमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन केलेल्या पंचनाम्याचे अहवाल ग्रामपंचायतीमध्ये सादर करावे आणि हे अहवाल

चावडीवाचन करून नागरिकांना सांगावे.

 

 

शासकीय यंत्रणेने केलेल्या पंचनाम्यावरच नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानाची मदत मिळत असल्याने खरीप पिक आणि फळबागा यांचे व्यवस्थित पंचनामे करावे. साधारणतः 242 कुटुंबे पुराच्या पावसामुळे बाधित झाले आहे. त्यामुळे त्यांचाही अहवाल शासनाकडे सादर करावा. गतीने पंचनामे होण्यासाठी इतर भागातील तलाठी आणि मंडळ अधिकारी याची पंचनाम्याकरिता नियुक्ती करण्यात यावी. नुकसान झालेल्या घरांसाठी दहा हजार रुपयाची मदत मिळत असल्याने यासाठीही शासकीय यंत्रणेने व्यवस्थितरित्या पंचनामे करावेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेत पिकाच्या पंचनाम्यासाठी स्थायी आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही आदेशाची गरज नाही. तलाठी आणि मंडळ अधिकारी स्वतः नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करून शासनाकडे सादर करू शकतात. तालुक्यात पर्जन्यमान मापन यंत्रे सुव्यवस्थेत असल्याची खात्री करावी. पर्जन्यमानाच्या आकडेवारीवर नुकसान भरपाई मिळते. पिंपरी गवळीमध्ये 200 , तर कोलोरी येथे शंभर हेक्टर जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे याचे तातडीने पंचनामे करण्यात यावे. स्थानिक नागरिकांनी पंचनाम्यासाठी सहकार्य करावे. तसेच नुकसान झालेल्या एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *