जातीयवादी अनुराग ठाकूर यांनी राजीनामा द्यावा :- ॲड.जयश्री शेळके
भारतीय लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान माननीय केंद्रीय वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, खा. राहुलजी गांधी यांनी केंद्रीय वित्त विभागात कार्यरत दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक तसेच इतर मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या संख्येबद्दल चर्चा केले असता सदनात उपस्थित भारतीय जनता पक्षाचे खासदार तथा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी अत्यंत असभ्य, असंवैधानिक पद्धतीने मा. खा. राहुलजी गांधी यांना त्यांच्या जातीची विचारणा करत तुच्छतेने त्यांच्या भाषणातील विषयांची व मुद्द्यांची हेटाळणी केली.
सदर बाब संसदीय लोकशाहीची सहा दशकांची दैदिप्यमान परंपरा असलेल्या भारतीय संसदेच्या प्रतिमेला डागाळणारी आहे. मुद्देसुत चर्चेच्या माध्यमातून वादविवाद होणे अपेक्षित असताना खा. राहुलजी गांधी यांचा अपमान करण्याच्या हेतूेने खा. अनुराग ठाकूर यांनी संसदेत केलेले वक्तव्य हा अप्रत्यक्षपणे भारतीय संसद, भारतातील दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, इतर मागासवर्गीय तसेच तसेच तमाम भारतीय नागरिकांचाही अपमान आहे.
माननीय अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्ष नेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांना केलेली जातीची विचारणा त्यांच्या संकुचित मनोवादी मनोवृत्तीचे दर्शन घडवते. दुर्दैवाने अजूनही जातीयवादी मनोवृत्ती देशातून समूळ नष्ट झालेली नाही. खासदार ठाकूर यांचे विधान हे केवळ राहुलजी गांधीच नाही तर या देशाच्या मूलनिवासी नागरिकांची अवहेलना करणारे आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत. भारतीय जनता पक्ष हा संविधान मानत असेल तर अशा असंवैधानिक कृत्याबद्दल खासदार अनुराग ठाकूर यांनी जनतेची आणि श्री.राहुल गांधी यांची जाहीर माफी मागावी तसेच या पुढच्या काळात कुणीही लोकशाहीविरोधी भूमिका घेऊ नये यासाठी ठाकूर यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲड.जयश्री शेळके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.