*रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची मलकापूर उपविभागीय कार्यालयवर धडक…*
*पिकविमा, सोयाबीन-कापसाचा भाव फरक, कर्जमुक्ती व फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तुपकरांसह शेतकरी आक्रमक…*
मलकपुर:- शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर उपविभागीय कार्यालयावर आज ता.०३ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी धडक दिली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मलकापूर परिसरात डॉ.प्रफुल्ल पाटील नामक व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांची ९० कोटी पेक्षा जास्त रक्कम घेवून हा व्यापारी फरार झाला आहे. या व्यापाऱ्यावर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांच्या पैसे वसूल करून द्यावे, अशी आग्रही मागणी तुपकरांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली. त्याचबरोबर गेल्या वर्षीचा १००% पिकविमा व नुकसान भरपाई मिळावी, जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे, वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढावे, गेल्यावर्षीचा सोयाबीन-कापसाला प्रति क्वि. ३०००/- रु. भाव फरक मिळावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी यासह इतर मागण्यांसाठी मलकापूर उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
यावेळी रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत आज शांततेच्या मार्गाने आलो, लवकरात-लवकर मागण्यांसंदर्भात निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला.