समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार : सतीश पवार

समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार : सतीश पवार
जयभीम एकता परिषदेत परिवर्तनाचा नारा : सत्ता काबीज करण्यासह समाज संघटन मजबुतीचा निर्धार

बुलढाणा
समाजाला प्रगतिपथावर नेणे हे आपले ध्येय असून, समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील, अशी ग्वाही भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी रविवारी जयभीम एकता परिषदेत दिली. अन्यायाविरोधात लढा उभारण्यासोबतच युवकांना रोजगार मिळवून देणे, समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी विधानसभेत सतीश पवार यांच्या रुपात हक्काचा आमदार निवडून देणे, समाजाला एकत्र करून समाज संघटन मजबूत करणे, विविध सामाजिक प्रश्न तडीस नेण्यासह परिवर्तन घडविण्याचा एकमुखी नारा यावेळी देण्यात आला.
भीम आर्मीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेत जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी जिल्ह्यात युवकांची मोठी फळी उभी केली आहे. सामाजिक एकोपा अबाधित कसा ठेवता येईल, यावर त्यांनी सूक्ष्म नियोजनानुसार कार्य सुरू ठेवले आहे. सोबतच चळवळ जिवंत ठेवण्याचे कार्य हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने बुलढाण्यातील गोलांडे लॉन येथे ११ ऑगस्ट २०२४ रोजी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे व प्रदेश कार्याध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘जयभीम एकता परिषद’ घेण्यात आली.
या परिषदेत संविधानविरोधी घडामोडींवर सखोल चर्चा करण्यात आली. अनुसूचित जाती व जमाती संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला घटनाबाह्य निर्णय, राजकीय परिवर्तन काळाची गरज समस्या व उपाय, आंबेडकरी चळवळीची सद्यस्थिती यामधील दशा आणि दिशा, बौद्ध समुदायाचे राजकीय अवमूल्यांकन व बौद्ध संस्कृतीचा ऱ्हास, राजकीय नेतृत्व आणि समाजातील वैचारिक वर्ग यांच्यामध्ये समन्वय असणे काळाची गरज, तसेच शिक्षण, आरोग्य, रोजगार, सुरक्षा व सहकार या संदर्भात स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणे या विषयांवर अशोक कांबळे, सुनील गायकवाड व सतीश पवार यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ साहित्यिक भरत जाधव, इतिहासकार राजेश साळवे, भीम आर्मीचे जिल्हा महासचिव अर्जुन खरात, जिल्हा संघटक बाला राऊत, मेजर लक्ष्मण साळवे, सुरेश जाधव, अजय पडघान, किरण पवार, राहुल वानखेडे, किशोर चव्हाण, सतीश गुरचवळे, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र खंडेराव, विजय दोडे, लाला गवई, सत्यपाल अहिरे, किशोर पैठणे, संजय वानखेडे, साहेबराव पारवे, बाबुराव सुरडकर, समाधान पवार, अनिल पवार यांनी ही परिषद यशस्वी केली.

समाजहितासाठी सतीश पवारांना आमदार बनवा : कांबळे

विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी उच्चशिक्षित असलेले सतीश पवार अहोरात्र काम करत आहेत. समाजाचा नेता म्हणून नव्हेतर एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची त्यांची तळमळ त्यांच्यात दिसते. कायद्याचे ज्ञान, जिज्ञासूवृत्ती, प्रश्न सोडवून घेण्याची कायदेशीर हतोटी या सर्व बाबी पाहता ते विधानसभेत दमदार नेतृत्व करू शकतात. भीम आर्मीचे आमदार म्हणून त्यांना निवडून द्या. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी याप्रसंगी केले.

नियमावलीनुसार अहोरात्र झटणार

परिषदेत झालेली चर्चा, उपस्थित समाजबांधवांकडून आलेल्या सूचनांची एक नियमावली बनविण्यात आली. त्या सूचनांचा अभ्यास करून समाजाला अपेक्षित काम करण्याचा संकल्प बोलून दाखवत या कार्यासाठी अहोरात्र झटेन, असे अभिवचनही सतीश पवार यांनी यावेळी दिले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *