प्रस्थापितांच्या चिखली विधानसभा गडात भीम आर्मीची ‘रॉयल एण्ट्री’

प्रस्थापितांच्या चिखली विधानसभा गडात भीम आर्मीची ‘रॉयल एण्ट्री’
सामाजिक परिवर्तन रॅलीने दणाणले शहर : भीम आर्मीच्या संपर्क कार्यालयाचे जल्लोषात उद्घाटन

बुलढाणा
सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी भीम आर्मीचे वादळ शनिवार, ३१ ऑगस्टला चिखली शहरात महारॅलीद्वारे घोंगावले. जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात या विशाल रॅलीच्या माध्यमातून प्रस्थापितांचा गड असलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघात भीम आर्मीची दमदार एण्ट्री झाली. बौद्धबांधवांसह बहुजनांनी एकत्र येऊन कोणत्याही परिस्थितीत प्रस्थापितांचा हा गड काबिज करण्यासाठी जीवाचे रान करावे, असे आवाहन सतीश पवार यांनी यावेळी केले.
बुलढाण्यातील भीम आर्मीच्या जिल्हा संपर्क कार्यालयापासून जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात  शेकडो गाड्यांचा ताफा चिखलीकडे सकाळी रवाना झाला. चिखलीत पोहोचल्यानंतर प्रारंभी शहीद कैलास पवार यांच्या स्मारकास सतीश पवार यांच्यासह उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. शहीद कैलास पवार अमर रहे…, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह, महात्मा फुले यांचा जयघोष करण्यात आला. पुढे मोटारसायकल रॅलीसह मधोमध सतीश पवार हाती निळा झेंडा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन जनतेला सामाजिक एकतेचा संदेश देत होते.
सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत भीम आर्मीचा नारा पोहोचवण्याकरिता जनतेचे सेवक म्हणून भीम आर्मी सर्वसामान्य व्यक्तींची समस्या सोडविण्यास तत्पर राहील, अशी ग्वाही सतीश पवार यांनी यावेळी दिली. परिवर्तन महारॅलीदरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रॅलीचे चिखली येथील भीम आर्मीच्या संपर्क कार्यालयावर आगमन झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी कार्यालयाचे फित कापून उद्घाटन केले. सामाजिक चळवळीमध्ये योगदान दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाला राऊत, अर्जून खरात, ॲड. कैलास कदम, प्रा. किरण पवार, सतीश गुरुचवळे, राहुल दाभाडे, संतोष कदम, राहुल वानखेडे, जितेंद्र खंडेराव, अमोल इंगळे, सुरेश जाधव, शरद खरात, खरे, माधवराव वाकोडे, संजय जाधव संजय वानखडे, नदीमभाई, विजय दोडे, अनिल शिखरे, अनिल खरात यांच्यासह आंबेडकरी चळवळीमधील सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, शाखा पदाधिकारी व शेकडोंच्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.

भाषणातून मांडली आंबेडकरी विचारधारा
सामाजिक परिवर्तन करण्यासाठी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा जनतेला सांगताना सतीश पवार यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना घाम फोडला. प्रस्थापित राजकारण्यांना हद्दपार करण्यासाठी तसेच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी चिखली येथे भीम आर्मीचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले.

‘अबकी बार, बौद्ध आमदार’
प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी उपस्थित भीमसैनिकांनी ‘अबकी बार, बौद्ध आमदार’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. ‘जीतनी जिनकी संख्या भारी, उतनी उनकी भागीदारी’ या तत्त्वानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व जाती समूहांच्या उमेदवाराचा येणाऱ्या विधानसभेसाठी भीम आर्मीतर्फे विचार केला जाईल, असे सतीश पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *