*रविकांत तुपकरांच्या “मुक्काम आंदोलना”च्या दणक्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा होण्यास सुरुवात*

*रविकांत तुपकरांच्या “मुक्काम आंदोलना”च्या दणक्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा होण्यास सुरुवात*

*”मुक्काम आंदोलना”मुळे तुपकरांवर शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल ; पण पिकविमा जमा होत असल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा*

बुलडाणा (प्रतिनिधी ता.३०): – पिकविम्याच्या प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेपासून बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात “मुक्काम आंदोलन” सुरू केले होते. अंथरून पांघरून आणि बॅग घेऊनच ते जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात पोहोचले होते. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याची रक्कम जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली होती. तुपकरांच्या आक्रमक भूमिकेमुळे पिकविमा कंपनीने बुलढाणा जिल्हातील १ लाख २६ हजार २६९ अपात्र शेतकऱ्यांचा पिकविमा मंजूर करत असल्याचे लेखी पत्र रविकांत तुपकरांना दिले. सरकारकडून पैसे प्राप्त होताच या शेतकऱ्यांच्या खात्यावर २३२ कोटी ४८ लाख रु. जमा होणार आहे, या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. परंतु पात्र शेतकऱ्यांना गेल्या ९ महिन्यांपासून हक्काचा पिकविमा का दिला नाही..? आजच्या आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा करा व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर कारवाई करा, यासाठी तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला अखेर रात्री सव्वा आठ वाजता प्रचंड पोलीस बंदोबस्तात तुपकरांना अटक केली, यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालया समोर जमलेल्या शेतकऱ्यांनी तसेच तुपकर यांच्या समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है…!अशा घोषणा शेतकऱ्यांकडून देण्यात आल्या. त्यामुळे बुलढाण्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांच्या तक्रारीवरून रविकांत तुपकरांवर भारतीय न्याय संहिता कलम १३२ अंतर्गत शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला व मध्यरात्री तुपकरांची तात्पुरत्या जामिनावर सुटका करण्यात आली. पण तुपकरांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ए.आय.सी.कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पात्र ४७ हजार ७०७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११२ कोटी २९ लाख रु. पिकविमा जमा करण्यास सुरुवात केली आहे. जर कंपनीने बुधवार ०२ ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवार पर्यंत पैसे जमा केले नाही तर कंपनीचे कार्यालय जागेवर ठेवणार नाही, असा इशारा तुपकरांनी दिला आहे.
सरकारकडून पिकविम्यासाठी वारंवार तारीख पे तारीख देण्यात येत असल्याच्या धोरणाचा निषेध तुपकर यांनी केला आहे. १५ सप्टेंबर पर्यंत पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असा शब्द कृषी सचिवांनी याआधी दिला होता, तो शब्द सरकारने पाळला नाही म्हणुन तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेत, गादी, उशी व बॅग घेवून रविकांत तुपकरांनी बुलढाणा जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयात “मुक्काम आंदोलन” चालू केले. शेतकऱ्यांनी नुकसान केल्याची तक्रार केल्यानंतर २५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा नियम असतांना ९ महिने झाले तरी जर शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही, मग कृषी विभाग काय करतो आहे, कंपनीवर कारवाई का करत नाही..? असा सवाल रविकांत तुपकरांनी उपस्थित करत जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याचे पैसे पडत नाहीत तोपर्यंत आपण इथेच मुक्काम करणार आहोत असे म्हणत जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांच्या कार्यालयात अंथरूण आणि पांघरून सोबत घेऊन जात रविकांत तुपकर यांनी मुक्काम आंदोलन चालू केले आहे. तुपकरांनी मुक्काम आंदोलन चालू केल्याचे कळताच शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर मोठी गर्दी केली आहे, तर कृषी अधीक्षक कार्यालयात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला असून कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते. अखेर रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेतले.
दरम्यान रविकांत तुपकर यांनी पोलीस कारवाईचा निषेध करत, पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, असा आरोप तुपकर यांनी केला. मला गोळ्या घातल्या किंवा फासावर चढवले तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या मागण्यावरून मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका रविकांत तुपकरांनी घेतली होती, तुपकरांच्या भूमिकेमुळे पिकविमा जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

*आमच्यावर गुन्हा दाखल केला…शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर केव्हा गुन्हा दाखल करता..?- तुपकर*

आम्ही हक्काचा पिकविमा मागतो आहे, त्यासाठी आंदोलन करतो म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल करता पण गेल्या ९ महिन्यापासून शेतकऱ्यांना पिकविमा देण्यास विलंब करणाऱ्या कंपनीवर कारवाई का करत नाही..? आता आमची पिकविमा कंपनीने फसवणूक केली म्हणून खुपगाव येथील शेतकरी अनिल पडोळ व येळगाव येथील शेतकरी पंजाबराव गडाख यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे ए.आय.सी. पिकविमा कंपनी विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सरकार कंपनीवर केव्हा गुन्हा दाखल करणार…? असा संतप्त सवाल तुपकरांनी केला आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *