आई जिजाऊ शक्ती दे’…उमेदवारी घोषित होताच ‘ जयश्रीताई ‘मातृतीर्थावर नतमस्तक
* शहरात ठीक-ठिकाणी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
बुलडाणा
बुलडाणा विधानसभा मतदार संघाकरिता काल ‘मातोश्री’ वरून जयश्रीताई शेळके यांच्या नावाची घोषणा झाली. एबी फॉर्म हाती मिळताच त्यांनी मुंबईवरून मातृतीर्थ सिंदखेड राजा गाठले. जिजाऊ चरणी त्या नतमस्तक झाल्या. जिजाऊ पाठीशी, असेल तर इतिहास घडतो, हे शिवकाळात दिसले आहे. त्याच जिजाऊंवर प्रगाढ निष्ठा असणाऱ्या जयश्रीताई राजकीय इनिंगसाठी सज्ज झाल्या आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते छगन मेहत्रे, जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे जाधव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अनिल मेहेत्रे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सिध्दार्थ जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे, नगरसेवक विजय तायडे, नगरसेवक गणेश चौधरी, नगरसेवक योगेश म्हस्के, नगरसेवक राजेंद्र आढाव, माजी जि.प सदस्य मधुकर गव्हाड, दिपक ठाकरे, रामदास कुरंगळ, शिवाजी गव्हाड आदी उपस्थित होते.
आई जिजाऊ शक्ती दे, अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, डॉ.बाबसाहेब आंबेडकर या महापुरुषांना त्यांनी अभिवादन केले. अहिल्याबाई होळकर यांच्या पुढे त्या नतमस्तक झाल्या. जयश्रीताई शेळके ह्या विचारांनी भारलेलं व्यक्तिमत्व, राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, मुक्ता साळवे, माता रमाई या महान महिलांना आदर्श मानून त्यांची वाटचाल सुरु झालेली आहे, मात्र राजकारणातही त्या महापुरुषांच्या विचाराशी बांधिल असल्याच आज दिसून आले. त्यानंतर सिंदखेड राजा वरून बुलडाण्याकडे निघाल्या. बुलडाणा येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे भरवत आनंद व्यक्त केला.
बुलडाणा येथील चिखली रोडवरील संपर्क कार्यालयाच्या ठिकाणी आज 24 ऑक्टोंबर रोजी मतदार संघातील चहात्यांनी एकच गर्दी केली होती. महिला वर्गांचा भरणा त्यात मोठा होता. सायंकाळ पर्यंत अनेकांनी येऊन त्यांची भेट घेतली. जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी मिळाल्याने बुलडाणा शहरामध्ये ठिकठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आला. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या.
* 35 वर्षानंतर महिलेस प्रथमच उमेदवारी :
बुलडाणा मतदारसंघाचा इतिहास पाहिल्यास इंदिराबाई कोटमकर , सुमनताई पाटील यांनी एक काळ या ठिकाणी प्रतिनिधी केले. मात्र त्याला ३५ वर्ष एव्हढा मोठा कालखंड लोटला आहे. प्रदीर्घ काळानंतर प्रथमच बुलडाणा विधानसभेच्या मतदार संघांमध्ये एक महिला जयश्रीताईंच्या रूपाने निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. तसेच बुलडाणा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या इतिहासातील देखील ही पहिलीच घटना आहे. मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यात महिला उमेदवाराला शिवसेनेने प्रथमच संधी दिली हे विशेष.