मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे मानधन वितरित करा
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची मागणी
बुलढाणा: राज्य मागासवर्ग आयोगाद्वारे करण्यात आलेल्या मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे मानधन अधिकारी व कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात यावे, अशी मागणी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्यावतीने २१ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशाने मराठा आरक्षणासंबंधी सर्वेक्षण जानेवारी महिन्यात युध्द पातळीवर करण्यात आले होते. या सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना मानधन देण्यासंबंधी १० जानेवारी २०२४ रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीत ठराव घेण्यात आला. त्यानंतर कामाच्या स्वरूपावर मानधन निश्चित करण्यात आले. हे मानधन अद्यापही अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही.
याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी विनंती संघटनेच्यावतीने करण्यात आली. याबाबत जिल्हाध्यक्ष किशोर पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन मोतेकर जिल्हा सचिव अनिल हिस्सल, तालुकाध्यक्ष गजानन पडोळ, संजय खांडवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.