रणजीतसिंग राजपूत, संदीप वानखेडे, कैलास राऊत, शौकत शाह मानकरी
बुलडाणा :
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मानस फाउंडेशनच्या वतीने वृत्तपत्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा “वृत्तगौरव पुरस्कार” देवून गौरव करण्यात येत आहे. या वर्षीच्या पुरस्कारासाठी पत्रकार रणजित सिंग राजपूत, पुढारी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संदीप वानखेडे, संपादक कैलास राऊत ,शौकत शाह यांची निवड करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट रोजी सदर पुरस्कार वितरण समारंभ बुलडाणा येथे होत आहे.
मानस फाउंडेशन म्हटले की, आठवते ते विधवा विवाहाची चळवळ, विधवा परिषदा, विधवांसाठी कार्य, प्राध्यापक डी. एस.लहाने यांनी मानस फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. त्यांच्या संकल्पनेत उभे राहिलेले मानस फाउंडेशन आज राज्यभर सामाजिक कार्यासाठी ओळखले जात आहे. याच फाउंडेशनच्या माध्यमातून या वर्षीसाठी पहिल्या वृत्तगौरव पुरस्कारची घोषणा निवड समितीचे डी. एस. लहाने, गणेश निकम केळवडकर, प्रा.शाहिना पठाण यांनी केली आहे. पत्रकार रणजित सिंग राजपूत, संदीप वानखेडे , कैलास राऊत, शौकत शाह या तरुण फळीची निवड यंदासाठी केली आहे.
पत्रकार रणजीत सिंग राजपूत यांनी सकारात्मक पत्रकारितेचा परिचय जिल्हा वाशीयांना दिला आहे. खुसखुशीत आणि सदाबहार व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले रणजीत सिंग राजपूत हे सकस लेखणीचेही धनी आहे. आपल्या चतुरस्त्र लेखणीच्या माध्यमातून सकारात्मक पेरणी ते करीत आले आहे. भले तरी देऊ काशीची लंगोटी या वृत्तीने पत्रकारितेचे वान घेवून ते वावरत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील विविध सामाजिक चळवळीशी ते निगडित असून जिल्ह्याचे प्रश्न धसास लावण्यासाठी त्यांची लेखणी कायम झिरपत आली आहे. टीव्ही न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संदीप वानखेडे हे सुद्धा गेल्या क्रीत्येक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. त्यांनी आपल्या संशोधक पत्रकारितेचा परिचय दिला आहे. अलगद बातमी शोधणे व उपेक्षित विषयांना वाचा फोडणे हे वानखेडे यांचे वैशिष्ट्य राहिले आहे. तर पत्रकार कैलास राऊत यांनी देऊळगाव माळी सारख्या टीचभर गावातून दैनिक चालून अनेकांना लिहिते केले आहे.
राज्यभर त्यांचा वचक वर्ग असून सर्वसामान्य परिस्थितीमध्ये असणार हा तरुण पत्रकारितेमध्ये येऊ पाहणाऱ्या नवीन पिढीसाठी आयडॉल आहे. तसेच निरपेक्ष व निर्मळ व्यक्तिमत्त्वाचे धनी असणाऱ्या शौकत शाह यांनी गेल्या 22 वर्षापासून सातत्यपूर्ण पत्रकारिता करून आपला परिचय दिला आहे. अजातशत्रू असणारे शौकतभाई हे सर्वांशी जुळणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या एशिया मंच न्युज ग्रुप चे दैनिक एशिया मंच च्या माध्यमातून त्यांनी पत्रसेवा अखंडित ठेवली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत सदर पुरस्कार दिले जात आहे. दिनांक 13 ऑगस्ट रोजी बुलडाणा येथे एका कार्यक्रमात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे. या पुरस्काराची घोषणा आज निवड समितीने केली आहे