शहिदांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन — सुनील सपकाळ
बुलडाणा
शहिदांनी आपल्या प्राणाची आहुती दिली व दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांना हद्दपार केले. यासाठी अनेकांना फासावर जावे लागले.देश आझाद होण्यासाठी झटलेल्या अनाम वीरांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे आजचा स्वातंत्रता दिवस आहे, असे प्रतिपादन ‘लोकमंच बुलढाणा’ या सामाजिक फोरमचे कार्याध्यक्ष सुनील सपकाळ यांनी केले. शहीद स्मारक या ठिकाणी लोकमंच व मानस फाउंडेशन च्या वतीने शहिदांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पुष्पचक्र अर्पण करून सदस्यांनी प्रथम शहीद स्मारकावर माथा टेकला.
पुढे बोलताना सुनील सपकाळ म्हणाले – देश आज ताठ मानेने उभा आहे. देशाची प्रगती झपाट्याने होत आहे. मात्र ज्यांच्यामुळे ही फळे आपण आज चाखत आहोत ते शहीद आज आपल्यात नाहीत ही मोठी खंत आहे. ज्यांनी रक्त सांडले, स्वातंत्र्य मिळून दिले त्यांचा त्याग देशवासीय कधीही विसरणार नाहीत. देश तोडण्याचा, जाती-धर्माचे विष पेरण्याचा कितीही प्रयत्न होवू द्या पूर्वजांची शिकवण एवढी भर भक्कम आहे की असे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. असे सांगून त्यांनी शहिदांना अभिवादन केले.
मानस फाउंडेशनचे अध्यक्ष डी एस लहाने यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. देश स्वतंत्र होत असताना बुलढाणा जिल्ह्यातील अनेकांनी प्राणाची आहुती दिल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य शाहीनाताई पठाण यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या आठवणी जागवल्या. महात्मा गांधी ,सुभाष चंद्र बोस ,शहीद भगतसिंग इतर क्रांतिकारकांनी केलेले कार्य हे आजच्या प्रगतीचा पाया असल्याचे त्या म्हणाल्या. प्रज्ञाताई लांजेवार व अमोल रिंढे यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन पत्रकार गणेश निकम केळवदकर यांनी तर आभार मनीषा वारे यांनी मानले. यावेळी सुरेश साबळे,पत्रकार संदीप वानखेडे, शोकत शहा, अनिता कापरे ,ज्योती पाटील, वृषाली लहाने ,संदीप जाधव, गौरव देशमुख ,शैलेश खेडकर ,प्रतिभा भुतेकर आदींची उपस्थिती लाभली. शेवटी सुनील सपकाळ यांनी राष्ट्रीयत्वाची शपथ दिली.