जिल्हा न्यायालयाच्या कोनशिलेचे अनावरण
बुलडाणा, दि. 24 : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारात कोनशिलेचे अनावरण केले.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, नागपूर खंडपीठाचे मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, औरंगाबाद मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती विनय जोशी, न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके, न्यायमूर्ती अविनाश घारोटे, न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती श्री. सुर्यवंशी, न्यायमूर्ती श्री. खोब्रागडे, जिल्हा व सत्र न्यायाधिश स्वप्नील खटी यांच्यासह वकील संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी न्यायमूर्ती श्री. गवई यांना पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. दरम्यान देऊळगाव राजा येथील न्यायाधीश शैलशे कंठे यांचे निधन झाले. त्यामुळे सहकार विद्या मंदिर येथे आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम रद्द करण्यात आला. न्यायाधीश श्री. खटी यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी श्री. कंठे यांच्या निधनाची माहिती दिली. त्यानंतर न्यायमूर्ती श्री. गवई यांनी शोक भावना व्यक्त केल्या. उपस्थितांनी दोन मिनीटे मौन पाळून श्री. कंठे यांना श्रद्धांजली वाहिली.