*आर्थिक उन्नतीची दिशा ; तीन दिवशीय भरगच्च बचत गट प्रदर्शनीचा समारोप….करोडोंची उलाढाल*
*’जयश्रीताईंनी’ ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम केले – भाईजी*
बुलढाणा : दिशा बचत गट फेडरेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. ग्रामीण महिलांना आत्मविश्वास देण्याचे काम जयश्रीताईंनी केले आहे. असे प्रतिपादन बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांनी महिला उद्योजक तथा बचत गट प्रदर्शनीच्या समारोपीय कार्यक्रमात केले.
बुलढाणा येथे तीन दिवशीय भव्य बचत गट प्रदर्शनीचे आयोजन दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून जयश्रीताई शेळके यांनी बुलडाणा येथे केले होते. त्याचा समारोप काल पार पडला. या प्रदर्शनीमध्ये तळागाळातील महिलांची उस्फुर्त उपस्थिती लाभली. महिलांनी आणलेले गृह उपयोगी पदार्थ, खाद्य पदार्थांची रेलचेल, बचत गटाच्या महिलांचे विविध स्टॉल,त्यामध्ये झालेली करोडो रुपयांची उलाढाल पाहता ‘दिशाचे’ आयोजन कमालीचे यशस्वी ठरले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयश्रीताई शेळके होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गणेश पाटील, स्नेहलता मानकर, माधवी जवरे, ॲड. अनुराधा वावगे , भाऊसाहेब शेळके, के.एस.बोरे व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी प्रदर्शनीमध्ये भाग घेणाऱ्या काही महिलांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी बचत गटाच्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.
*बॉक्स*
*ताई खूप मोठ्या व्हा, आम्ही सोबत आहोत – महिलांनी व्यक्त केली भावना*
यावेळी प्रदर्शनी मध्ये सहभागी झालेल्या महिलांनी यशस्वी आयोजनाबद्दल जयश्रीताई शेळके यांचे आभार मानले. जयश्रीताई यांच्या बद्दल महिला भरभरून बोलल्या. ताई तुम्ही खूप काही दिलं …तुम्ही सर्वसामान्य माणसांमध्ये सहज मिसळता, कुठला बडेजाव नाही वा कुठला संकोचही नाही, समोरच्याला आर्थिक उन्नतीचा विश्वास तुम्ही देता, तुम्ही दिलेली ऊर्जा घेवून आम्ही जात आहे. महिलांनी घरातून बाहेर पडून आर्थिक उन्नतीचा मार्ग धरला पाहिजे हा मूलमंत्र तुम्ही दिल्यामुळे महिलांना आर्थिक प्रगतीची दिशा मिळाली. असा सूर यावेळी मनोगतातून महिलांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवर यांनीही मनोगत व्यक्त केले.
*बॉक्स*
*महिलाच उद्याची नवी दिशा ठरविणार – ॲड.जयश्री शेळके*
दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून असंख्य महिला उद्योजक निर्माण होऊन त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ह्याच महिला उद्याची ताकत आणि नवी दिशा घेऊन समोर येतील असा विश्वास जयश्री शेळके यांनी व्यक्त केला. तसेच ज्या महिलांनी प्रदर्शनीमध्ये सहभाग घेऊन प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिले. अशा सर्व महिलांचे जयश्री शेळके यांनी आभार मानले.
*बॉक्स*
*करोडोंची खरेदी – विक्री*
बचत गट प्रदर्शनी मध्ये महिलांनी बनवलेल्या घरगुती वस्तू, विविध खाद्यपदार्थ, कपडे ,आदींची रेलचेल बघायला मिळाली. संध्याकाळी खाद्य जत्रेवर तर अक्षरशा: झुंबड पडली होती. शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी कुटुंबासह या ठिकाणी येऊन भोजनाचा आस्वाद घेतला. आवळ्यापासून बनवलेले विविध पदार्थ, जाम, लोणचे , पापड, आदी पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. तीन दिवसांमध्ये करोडो रुपयांची खरेदी विक्री झाल्याचे सांगितले जाते.त्यामुळे बचत गट प्रदर्शनी महिलांसाठी हक्काची बाजारपेठ ठरली.