आमदार श्वेताताईच्या कार्यामुळे चिखली ‘ विकसित ‘ मतदार संघ म्हणून ओळख प्राप्त करणार – ना. रक्षाताई खडसे

आमदार श्वेताताईच्या कार्यामुळे चिखली ‘ विकसित ‘ मतदार संघ म्हणून ओळख प्राप्त करणार – ना. रक्षाताई खडसे

* राज्य सरकारच्या विकासकामांची पावती आगामी विधानसभा निवडणुकीत मिळेल – ना. प्रतापराव जाधव

* चिखलीच्या पाणीपुरवठा योजनेसह १५३८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे झाले भूमिपूजन

चिखली
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य जनतेच्या सुख सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात विकास कामे व कल्याणकारी योजनांचे अंमलबजावणी सुरू करत आहे. या सर्व योजनांचे लाभ चिखली मतदारसंघात आ. श्वेताताई महाले ह्या अतिशय प्रभावीपणे पोहोचवत असल्याने आगामी काळात चिखली हा विकसित मतदारसंघ म्हणून निश्चितच ओळखला जाईल व यासाठी पुन्हा एकदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत श्वेताताईंच्या मागे आपले आशीर्वाद रुपी पाठबळ असू द्या, असे आवाहन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केले.
आमदार श्वेताताई महाले यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या चिखली शहरातील नळ योजना व हॅम आणि एबीडी अंतर्गत रस्त्यांची कामे अशा एकूण १५३८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून ना. रक्षाताई खडसे बोलत होत्या. केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी मंचावर आ. श्वेताताई महाले, बुलडाण्याचे माजी आमदार विजयराव शिंदे यांच्यासह महायुतीतील विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

      अमृत २.० तथा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर अभियान योजनेअंतर्गत १३२ कोटी रुपये किमतीच्या चिखली शहरातील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, EDB अंतर्गत चिखली तालुक्यातील पारध – धामणगाव – धाड – सावळी – साकेगाव – चिखली रा. म. २१४ रस्त्याची सुधारणा करणे, १४३/५०० ते १३२/५००, किंमत ३११ कोटी ६५ लक्ष रुपये, हॅम अंतर्गत चिखली तालुक्यातील चौथा-गिरडा रोड प्रजिमा २१ किमी, ४८/५०० ते ५२/५०० तसेच दुधा – माळवंडी – केसापूर – पांगरी – केळवद – किन्होळा – धोडप रोड रा. म. ४४१ ०/०० ते ३५/५००, लांबी ३९.५०० किमी रस्त्याची सुधारणा करणे, किंमत ३८४ कोटी ५८ लक्ष रुपये, हॅम अंतर्गत धोडप – पेठ – एकलारा – अंबाशी – चंदनपूर – मेरा – राहेरी बु. रा. म. ४३९, ०/०० ते ३२/०० ची सुधारणा करणे (ता. चिखली, जि. बुलढाणा), किंमत ३११ कोटी ६८ लक्ष रुपये, EDB अंतर्गत चिखली तालुक्यातील अमडापूर – जानेफळ – लोणी – गवळी – घाटबोरी – जनुना – पांगरखेड – बेळगाव – केनवड ते रा. म. ७५३, ०/०० ते ४८/९०० रस्त्याची सुधारणा, लांबी ४८.९०० किमी, किंमत ३९१ कोटी ७१ लक्ष रुपये या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले.

        यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात हजारो कोटी रुपयांचे विकासकामे सुरू असून ही किमया केवळ महायुती सरकार सत्तेवर आल्यामुळे शक्य झाली, असे मत व्यक्त केले. संविधान बदलाचे फेक नॅरेटिव्ह चालवणाऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने आपल्या विकासकामांमधून व शेतकऱ्यांच्या कल्याणकारी निर्णयांमधून चोख प्रत्युत्तर दिले, राज्य सरकारने केलेल्या कल्याणकारी कार्याची पावती जनता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच देईल, असा विश्वास ना. प्रतापराव जाधव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

<span;>* आज माझ्या स्वप्नपूर्तीचा क्षण – आ. श्वेताताई महाले

बालपणापासून आजवर मी चिखली शहराची पाणीटंचाई स्वतः अनुभवली आहे, त्यामुळे एक चिखलीकर म्हणून या समस्येचे निवारण करण्याचा मी मनोमन निर्धार केला होता. मतदारसंघाची आमदार या नात्याने चिखलीकरांना या समस्येतून कायमचे मुक्त करण्यासाठी मी सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले असून त्याचे फळ म्हणून आज १३२ कोटी रुपयांच्या या पाणीपुरवठा योजनेचे होत असलेले भूमिपूजन हा माझ्या स्वप्नपूर्तीचा क्षण आहे आहे, असे भावनिक उद्गार आ. श्वेताताई महाले यांनी काढले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिखली नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत शहराची पाणी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. आज भूमिपूजन होत असलेल्या या पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मदत व मार्गदर्शनामुळेच मान्यता मिळाल्याचा उल्लेख आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या भाषणातून केला व याबद्दल ना. फडणवीस यांचे आभार मानले.

<span;>* जनतेच्या आशीर्वादाने मिळाली विकासाची संधी :

एक गृहिणी म्हणून मी सुखी समाधानी असताना राजकारणात येण्याचा माझा कुठलाही मानस नव्हता परंतु चिखलीच्या राजकारणात असलेल्या वाईट प्रवृत्तींना नष्ट करण्यासाठी मी राजकारणात उतरले व जनतेनेही मला स्वीकारले. जनतेच्या या उपकाराची परतफेड मी पाच वर्षे सेविकाऱ्याची भूमिका बजावून केल्याचे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी केले. मतदारसंघात गेल्या दोन वर्षात ६१२ शेत रस्ते, १२२ नवीन रस्ते, २२ सोलर पार्क, ९५ टक्के गावात जलजीवन मिशनची अंमलबजावणी, महावितरणच्या उदयनगर उपविभागीय कार्यालयासह पेठ व पांगरी येथे सब स्टेशनला मंजुरी तसेच ‘ आमदार आपल्या दारी ‘ या अभियानांतून वैयक्तिक लाभाच्या योजना समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची संधी मला जनतेच्या आशीर्वादाने मिळाली. हेच आशीर्वाद येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा मतदार मला देतील, असा विश्वास देखील आमदार श्वेताताई महाले यांनी यावेळी व्यक्त केला.

<span;>* उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा व्हिडिओ संदेश :

आज झालेल्या चिखली शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार होते. परंतु, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्यांना या कार्यक्रमाच्या निमंत्रणाचा स्वीकार करणे शक्य झाले नाही. त्यामुळे फडणवीस यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या शुभेच्छा व आपले मनोगत व्यक्त केले. या व्हिडिओची चित्रफित सदर कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आली. आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. श्वेताताई महाले यांच्या विकासकार्याचे तोंड भरून कौतुक केले. आ. श्वेताताई महाले यांना आपल्या मतदारसंघातील समस्यांची जाण असून विकासकार्याबद्दल त्यांच्या मनात तळमळ असते. विकासकामांचा पाठपुरावा करण्याची इच्छाशक्ती मला नेहमी जाणवते अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आ. श्वेताताई महाले यांच्या कार्यपद्धतीचे वर्णन केले. चिखली मतदारसंघातील जनतेने ठेवलेला विश्वास सार्थ करत श्वेताताईंनी अतिशय उल्लेखनीय विकासकामे केली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील मतदारांनी पुन्हा एकदा त्यांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडिओ संदेशातून केले.

<span;>* मायबाप जनतेच्या सेवेसाठी

कायम कटिबद्ध – आ. श्वेताताई महाले

              नवरात्र व दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपले भारतीय सण व उत्सव विशिष्ट सामाजिक संदेश देत असतात. नवरात्र उत्सवात असुर अर्थात वाईट प्रवृत्ती संपवण्यासाठी शक्तीची उपासना केली जाते व सीमोल्लंघनाच्या दिवशी अशी प्रवृत्ती संपविण्यासाठी आगेकूच केली जाते. या वर्षीच्या दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आपल्याशी संवाद साधण्याचा योग प्राप्त झाला, हा योगायोगच आहे. शासनाच्या योजनांच्या माध्यमातून आपण सर्वांच्या जीवनात आनंद सुख प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहोत परंतु त्याला अडथळा करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधात ठामपणे उभे राहून त्यांना संपवण्याचा संकल्प आजच्या दिवशी आपण सर्वजण करू या. मायबापहो ! घराणेशाही, धाक, दडपशाही करून राजकारण करणे, सत्ता मिळवणे व फक्त स्वार्थ साध्य करणे हा माझा उद्देश नाही. तुम्ही सर्वजण माझ्या कुटुंबातील सदस्य आहात. कोणी लेक ,कोणी सून तर अनेकांनी बहीण म्हणून माझा स्वीकार केला. माझ्या कुटुंबातील सदस्यांची सेवा करता यावी, त्यांच्या जीवनातील दुःख कमी करता यावे यासाठी मी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. स्त्रियांच्या जीवनामध्ये पती व मुले यांचे स्थान काय असते हे मी आपणास सांगण्याची आवश्यकता नाही. सकाळी कामासाठी बाहेर पडलेला पती घरी परत येईपर्यंत व खेळण्यासाठी नजरेआड झालेले मुल परत दिसेपर्यंत आम्हा स्त्रियांचा जीव टांगणीला लागलेला असतो. मी राजकीय जीवनाचा प्रारंभ केला त्यावेळी खरेतर माझ्या मुलाला व पतीला माझी व मला त्यांची खूप गरज होती, परंतु त्यापेक्षाही आम्हाला या विधासभा क्षेत्रात होत असलेला अन्याय, अत्याचार संपवणे महत्वाचे वाटले. आणि म्हणूनच वैयक्तिक सुखी जीवन त्यागून मी आपल्यामध्ये आले. आपण केवळ मला स्वीकारलेच नाही तर २०१९ च्या निवडणुकीत आपण सर्वांनी आपली ताकद माझ्यामागे उभी केली, मला भरभरून मतदानरूपी आशीर्वाद दिले व तुमची प्रतिनिधी, आमदार म्हणून मला विधानसभेत पाठवले. माझ्या कार्यकाळात मी आमदार म्हणून नाही तर आपली सेवक म्हणून कार्य केले व आपल्या जीवनात सुखाच्या लहरी निर्माण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले, याचे आपण सर्व साक्षीदार आहात. या दरम्यान सर्व समाजघटकांना तसेच सर्व स्तरातील गरजूंना शासनाच्या माध्यमातून भरघोस लाभ मिळवून देण्यामध्ये मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यशस्वी झाले, असे मला वाटते. यातील काही महत्वाच्या कामांचा उल्लेख करते. कोरोना काळात गरोदर भगिनींना घरपोच फळे पोहोचवणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देणे, त्यांच्या कुटुंबियांना दिवाळी फराळ पोहोचवणे, स्त्रियांना भेडसावणाऱ्या दुर्धर अशा गर्भाशयमुख कॅन्सर प्रतिबंधक लस शिबीर आयोजित करणे. गेल्या सत्तर वर्षांच्या काँग्रेसच्या काळात शेलोडी सारख्या अनेक गावांमध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचले नव्हते, आणि जिथे पोहोचवण्याचे नाटक केले गेले तेथील लोक पाण्याचा थेंबा-थेंबासाठी हतबल झाले होते. आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघातील अशा गावांमध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध आणि स्वच्छ पाणी पोहोचवण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अशा गावातील माझ्या आई – बहिणींच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचे भाग्य मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्राप्त झाले, याचे मला खूप समाधान आहे. यापूर्वीच्या काळात गावात एखादे काम व्हायचे तर त्याचाच गवगवा केला जात असे. परंतु आज काय परिस्थिती आहे ? प्रत्येक गावात मोजताना दम लागेल इतकी विकासकामे पूर्ण झाली आहेत किंवा प्रगतीपथावर आहेत. शेतकरी बांधवांसाठी शेतरस्ते, औजारे, पंप वाटप, प्रत्येक समाजासाठी सामाजिक भवने. सर्वात महत्वाचे म्हणजे यापूर्वी वैयक्तिक शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला शासकीय कार्यालयाचे उंबरठे एजंटच्या माध्यमातून झिजवावे लागत होते, शिवाय आर्थिक लूट देखील होत होती. “आमदार आपल्या दारी” उपक्रमांतर्गत ग्रामदुतांच्या माध्यमातून आपण हे सर्व बंद केले, त्याचाच परिणाम आजचा हा भव्य दिव्य कार्यक्रम आहे. बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांना आपण संसार किट्सचे वाटप केले आणि त्यासाठी कोणालाही १ पैसा द्यावा लागला नाही. अशा अनेक वैयक्तिक लाभ योजना आपण सर्वांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत.  विजयादशमीच्या पर्वावर पुन्हा विजयाचा संकल्प करत विचारांचे सीमोल्लंघन आपण सर्वजण करू या आणि माझ्या संकल्पपूर्तीसाठी आणि आपल्या अपेक्षापूर्तीसाठी आपण सर्वांनी मला मतदानरूपी आशीर्वाद द्यावेत,
आपली पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी, अशा भावनिक शब्दात आ. श्वेताताई महाले यांनी आपले भावनिक मनोगत व्यक्त केले.

      यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रतापसिंह राजपूत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन मोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शंतनु बोंद्रे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय गवई, शिवसेना महिला आघाडीच्या मायाताई म्हस्के, भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, चिखली तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, बुलडाणा तालुका अध्यक्ष एड. मोहन पवार, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, जिल्हा सचिव कृष्णकुमार सपकाळ, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनीस, भाजपा सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष श्याम वाकदकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन खरात यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम वाकतकर, अनंत आवटे यांनी केले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *