*षडयंत्राची चौकशी करुन नावे कायम ठेवण्याची राहुल भाऊ बोंद्रे यांची मागणी*
चिखली विधानसभा मतदारसंघात हजारो नावे मतदार यादीतून गहाळ..
चिखली : चिखली विधानसभा मतदारसंघात हजारो मतदारांचा फॉर्म ७ व फॉर्म ८ ऑनलाईन भरुन त्यांच्या संमतीशिवाय मतदार यादीतून नावे वगळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात प्रामुख्याने मुस्लिम, मागासवर्गीय बहुल, हिंदु मविआच्या मतदाराची नावे रद्द करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मविआच्या मतदारांना मतदानापासून रोखण्याचे हे षडयंत्र असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, मतदार यादीतील नावे कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले की, या अगोदरही गहाळ मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी पोळ, तहसीलदार कोकाटे यांच्याकडे नावे कायम ठेवण्याची मागणी केली आहे. चिखली शहरात हे मतदार २५-३० वर्षांपासून राहत आहे. तसेच मागील अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र कुणा अज्ञात व्यक्तींनी त्यांची नावे त्यांच्या संमतीशिवाय मतदार यादीतून रद्द करण्यासाठी फॉर्म ७ व फॉर्म ८ अर्ज ऑनलाईन भरले. संबंधित बीएलओने याची पुष्टी केली असून या मतदारांना मतदानापासून रोखण्याचे हे षडयंत्र आहे. अज्ञात व्यक्तीने भरलेल्या फॉर्म ७ चा स्क्रीनशॉट आणि अर्जाचा रेफरन्स क्रमांकही आम्ही तक्रारीत नमूद केला आहे. या मागे कोण आहे याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली असल्याचेही राहुल बोंद्रे यांनी सांगितले. याप्रसंगी चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर, चिखली काँग्रेसचे शहराध्यक्ष अतरुद्दिन काजी, कार्याध्यक्ष निलेश अंजनकर, युवक अध्यक्ष रीक्की काकडे, डॉ. अमोल लहाने, जाकीर शेख यांची उपस्थिती होती.
*मुस्लिम, मागासवर्गीय बहुल, मविआच्या हिंदु मतदाराची नावे वगळणे यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयाचा दबाव तर नाही ना ? : राहुल भाऊ बोंद्रे*
देशालील सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या मताचे जेवढे मूल्य आहे. तेवढेच सर्वसामान्य गोरगरीब जननेतेच्या मताला, हा मूलभूत अधिकार भारतीय संविधानाने बहाल केला आहे. मात्र चिखली विधानसभा मतदारसंघात हजारो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे हुकुमशाही कृत्य केल्या जात असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले. जिल्ह्यात एकूण प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ८० टक्के तक्रारी या चिखली विधानसभा मतदरासंघातील आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम, मागासवर्गीय बहुल, हिंदू मविआच्या मतदाराची नावे वगळणे ही लोकशाहीची हत्या आहे. षडयंत्राचा वापर करुन हजारो मतदारांची नावे जशी वगळण्यात आली तसी सोयीच्या राजकारणासाठी अनेकांची नावे घुसाळण्यात आल्याची बाब निषेधात्मक आहे. चिखली मतदारसंघाचा संबध थेट उपमुख्यमंत्री कार्यालयाशी असल्याने त्यांचा कुठे दबाव तर नाही ना ? याची चौकशी होवून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असेही राहुल बोंद्रे म्हणाले.