सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये – कॉ.पंजाबराव गायकवाड
* 3 जानेवारी रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मुंबई मंत्रालयावर मोर्चा !
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
वाढलेली प्रचंड महागाई आणि तुलनेने मिळणारे तुटपूंजे मानधन याचा विचार केला तर याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. गेल्या ४८ वर्षा पासून अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या आपल्या प्रलंबित असलेल्या किमान वेतन, पेंशन, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा इत्यादी मागण्यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. 4 डिसेंबर 2023 पासून अंगणवाडी कर्मचारी ह्या आपल्या प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संपावर गेलेल्या आहेत. परंतू सरकार या प्रश्नावर अजिबात गंभीर नाही. उलट आंदोलन केले तर वेळोवेळी कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना दिल्या जात आहेत. संप फोडण्याचा आटोकाट प्रयत्न प्रशासनाकडून केल्या जात आहे. आज तीन आठवड्या पेक्षा जास्त दिवस होऊन सुद्धा बेमुदत संप सूरू आहे. 15 डिसेंबर रोजी नागपूर विधानसभेवर क्रुतिसमितीच्या नेत्रुत्वात राज्यातील 25 हजार अंगणवाडी सेविका मदतनीसांनी मोर्चा काढला परंतु सरकारने त्यांची दखल घेतली नाही. कुठलीही चर्चा व त्यावर तोडगा न काढता दररोज वेगवेगळ्या धमक्या सेविका मदतनीसांना दिल्या जात आहेत. राज्याच्या आयुक्तांनी अंगणवाडी सेविका मदतनीसांवर कारवाई करण्याच्या संदर्भात जिल्ह्यातील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना आदेश दिले आहेत. याचा निषेध करण्यासाठी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज 26 डिसेंबर 2023 रोजी सीटुचे जिल्हा अध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांच्या
नेतृत्वात जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका मदतनिसांनी चटणी भाकर खाऊन सरकारच्या नावाने प्रचंड घोषणाबाजी करून निदर्शने केली. तसेच आयुक्तांनी काढलेल्या पत्राची होळी करून सरकारचा निषेध केला.
जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद बुलडाणा असा मोर्चा काढून जिल्हा परिषद समोर प्रचंड घोषणाबाजी करून जिल्हा परिषद परिसर घोषणांनी दणाणून सोडला. सरकाने तातडीने संघटनेसोबत सकारात्मक चर्चा करून मानधन वाढीचा प्रश्न सोडविला नाही तर 3 जानेवारी रोजी राज्यातील 2 लाख 10 हजार अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या मुंबई येथे आझाद मैदानावर प्रचंड मोर्चा काढतील असा इशारा सुद्धा यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांनी सरकारला दिला. आजच्या आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी बुलडाणा तसेच उपमुख्यकार्यकारी अधिकारी महिला व बालविकास प्रमोद एंडोले यांना देण्यात आले. यावेळी पंजाबराव गायकवाड, सचिव प्रतिभाताई पाटील, सरला मिश्रा, जयश्रीताई क्षिरसागर, निशा घोडे, विजया शेळके, लक्ष्मी गवई , अनिता खडसे, वनमाला वानखडे, पुष्पलता खरात, उज्वला खंडारे, वर्षा शिंगणे, उषा जैवळ, डिवरे, प्रविणा बगाडे, अनिता वायाळ, संगीता मादनकर, सुनंदा मोरे इत्यादीसह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.