क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाची टीम १२ जानेवारी २०२४ रोजी सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या दर्शनाला येणार आहे. यावेळी शहरवासीयांच्यावतीने या टीमचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
समता फिल्म आणि अभिता फिल्मच्या वतीने ५ जानेवारी रोजी सत्यशोधक चित्रपट संबंध महाराष्ट्रभर प्रदर्शित झालेला आहे. महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य आणि आनंदमय सहजीवन पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर आले आहे. राज्यभर सत्यशोधक सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला, युवक, विद्यार्थी, व्यावसायिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हा चित्रपट बघितला आहे. इतरांनी सुद्धा हा चित्रपट बघावा याकरिता आवाहन केले आहे.
१२ जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त सत्यशोधकची टीम मातृतीर्थ नगरीत येत आहे. चित्रपटाचे संकल्पक राहुल तायडे, दिग्दर्शक नीलेश जळमकर, निर्माते सुनिल शेळके, ज्योतिबांच्या बालपणीच्या भूमिकेतील प्रथमेश पांडे , सावित्रीबाईंच्या बालपणीच्या भूमिकेतील समृद्धी सरवार, उस्मान शेख, फातिमा शेख यांच्या भूमिकेतील मोनिका तायडे कलाकारांसह तुकाराम बिडकर , नीता खडसे, कांचन वानखेडे, किरण डोंगरे, सीमा जाधव , सह निर्माता राहुल वानखेडे, सह निर्माता हर्षा तायडे व इतर सर्व कलाकार सकाळी ११.३० वाजता राजवाड्यावर जिजाऊंचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता अभिता ऍग्रो एक्स्पोच्या विचारमंचावर संपूर्ण सत्यशोधक टीमचा सिंदखेडराजा शहराच्यावतीने सामूहिक नागरी सत्कार केला जाणार आहे. तरी या सत्कार समारंभास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.