बातमी
रविकांत तुपकर करणार सरकारसोबत नवे युद्ध..* महाबळेश्वर येथील राज्यस्तरीय बैठकीत केली घोषणा, दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात वैचारिक मंथन

रविकांत तुपकर करणार सरकारसोबत नवे युद्ध..* महाबळेश्वर येथील राज्यस्तरीय बैठकीत केली घोषणा, दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात वैचारिक मंथन
रविकांत तुपकर करणार सरकारसोबत नवे युद्ध..
* महाबळेश्वर येथील राज्यस्तरीय बैठकीत केली घोषणा, दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात वैचारिक मंथन
महाबळेश्वर
सध्या आखाती देशांमध्ये युद्धाचे सावट आहे. या युद्धाची झळ अनेक देशांना बसत आहे. अशातच महाराष्ट्रातही एक नवे युद्ध छेडण्याचा इशारा युवा नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही अत्यंत तोकडी असून अन्यायकारक आहे. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. सध्या शेतकऱ्यांना कोणीच वाली उरला नाही त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील मावळ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवी ऊर्जा देण्यात आली असून आता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर नव्याने तीव्र आंदोलन उभारणार असल्याची घोषणा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली आहे. महाबळेश्वर येथे नुकत्याच पार पडलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर व राज्यस्तरीय बैठकीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथे नुकतेच 8 व 9 एप्रिल दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील निवडक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर पार पडले. या शिबिराला राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती दिसून आली. यावेळी समारोपीय सत्रात बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. ही कर्जमाफी अत्यंत तोकडी असून अन्यायकारक आहे. सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही अट न लावता सरसकट पाच लाख रुपये कर्जमाफी द्यावी व रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दीड लाखाचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे अशी आमची मागणी आहे. सोबतच सोयाबीन, कापूस, ऊस,कांदा, द्राक्ष, आंबा, चिकू, धान आदी उत्पादनाला शासनाने उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, भारत अमेरिका व्यापारी करार रद्द करावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आम्ही सरकारला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देत आहोत त्यानंतर राज्यभरात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावे रविकांत तुपकर यांनी दिला. शेतकऱ्यांच्या आणि जनसामान्यांच्या बाजूने बोलायला सध्या कोणी तयार नाही सर्व सत्तेसाठी हपापले आहेत, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा आवाज मांडण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्याला दाबण्याचे काम सरकार करत आहे. इडी व इतर यंत्रणांचा वापर करून सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना जाणीवपूर्वक दाबले जात आहे ही परिस्थिती या राज्यासाठी आणि देशासाठी चांगली नाही. इंदिरा गांधींनी आणलेल्या आणीबाणी पेक्षाही अत्यंत घातक परिस्थिती सध्या देशात आणि राज्यात दिसून येत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी एकजूट दाखवण्याची नितांत गरज आहे. शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य जनतेसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याची माझी तयारी आहे त्यासाठी ‘क्रांतिकारी’ च्या सगळ्या मावळ्यांनी मला साथ देणेदेखील तेवढेच गरजेचे आहे. आता राज्यभरात संघटना बांधणीचा उपक्रम हाती घेतला जाईल मी स्वतः राज्यभर दौरा करून संघटनात्मक बांधणी करणार आहे. राज्यभरात काही नवीन नियुक्त्या देखील केल्या जाणार आहेत जे जुने पदाधिकारी निष्क्रिय आहेत त्यांना बदलून त्यांच्या जागी नवे पदाधिकारी नियुक्त केले जातील आणि राज्यभरात क्रांतिकारी च्या मावळ्यांची सशक्त अशी फौज तयार केली जाईल असे यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले. ८ एप्रिल रोजी या प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली तर ९ एप्रिल रोजी या शिबिराचा आणि राज्यस्तरीय बैठकीचा समारोप करण्यात आला. दरम्यान हे दोन दिवशीय प्रशिक्षण शिबीर मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडले. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात ताजे तवाने होऊन आणि नवी ऊर्जा घेऊन कार्यकर्ते बाहेर पडले. 8 एप्रिल रोजी पहिला सत्राचे उद्घाटन इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी अतिशय मौल्यवान असे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केले. दुसऱ्या सत्रात सामाजिक कार्यकर्त्या ऍड वर्षाताई देशपांडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला तर तिसऱ्या सत्रामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या जागतिक स्तरावरील संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी आपल्या भाषणातून उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवी चेतना निर्माण केली. मोटिवेशनल स्पीकर प्रा. गणेश शिंदे, इंदौर वरून आलेल्या स्वातीताई काशीद, कोल्हापूर चे शेतकरी नेते वैभव कांबळे, शेतकरी नेते शिवाजी माने, क्रांतिकारी संघटनेचे विदर्भ प्रमुख तथा देवळीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरण ठाकरे,गजानन अमदाबादकर,ऍड शर्वरी सावजी -तुपकर, तथा व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के, अरविंद पवार आदींचे मार्गदर्शन यावेळी लाभले. प्रशिक्षण शिबिरानंतर प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी या शिबिराचा अनुभव आणि त्यांची भूमिका विशद केली. या दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिरातील आणि राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतील एकंदरीत सर्व चर्चा आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या सूचना समजून घेत रविकांत तुपकर यांनी आपल्या समारोपीय भाषणात संघटनेची सविस्तर भूमिका आणि दिशा मांडली.
* येणारा काळ ‘क्रांतिकारी’चा असेल : संदीप काळे
माझे सर्वच राजकीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चांगले संबंध आहेत. सत्ताधारी आणि विरोधातील अनेक नेत्यांसोबत माझी उठ बस आहे परंतु मी आजवर कोणत्याच पक्षाच्या स्टेजवर गेलो नाही, मात्र रविकांत तुपकरांचे काम हे तळागाळातील जनतेसाठी आहे. विचार आणि उद्दिष्ट घेऊन चालणारी ही संघटना आहे, त्यामुळे या संघटनेच्या व्यासपीठावर येण्याच धाडस मी आज केले आणि यापुढेही करत राहील असे प्रतिपादन यावेळी प्रसिद्ध लेखक, संपादक तथा व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या जागतिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी यावेळी बोलताना केले. क्रांतिकारी शेतकरी संघटना ही ज्वलंत विचारांची आणि सळसळत्या रक्ताच्या तरुणाईची संघटना आहे. शेतकरी चळवळीची धार आता बोथट झाली आहे येणारा काळ शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी अतिशय जिकरीचा आणि संकटाचा आहे आणि या काळात क्रांतिकारी शेतकरी संघटनाच ठामपणे उभी राहून शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांची बाजू मांडू शकते. येणारा काळात क्रांतिकारी संघटना ही राज्यातील सर्वात मोठा दबाव गट ठरेल त्यामुळे येणारा काळ क्रांतिकारीचा आहे असा विश्वास देखील यावेळी संदीप काळे यांनी व्यक्त केला.
* असा हिरा पुन्हा मिळणार नाही : अनिल मस्के
रविकांत तुपकर हे केवळ नेतृत्व नसून शेतकरी चळवळीतील एक वैचारिक वादळ आहे. गेल्या 30 वर्षात या नेत्याने घरादारावर तुळशीपत्र ठेवून केवळ शेतकरी चळवळीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. आंदोलन केले,उपोषण केले, रास्ता रोको केला, स्वतःला गाडून घेतले, जेलमध्ये गेला, पोलिसांचा मार खाल्ला, तडीपार झाला..अगदी जीवाची पर्वा न करता आजवर हा माणूस शेतकऱ्यांसाठी लढत आला आहे, असं नेतृत्व सहज घडत नाही. त्यामुळे आपला नेता कार्यकर्त्यांनी तळ हातावरच्या फोड्याप्रमाणे जपला पाहिजे. सत्तेसाठी आमदारकी आणि खासदारकीसाठी या नेत्याने आपल्या विचारांशी आणि शेतकरी चळवळीशी कधीच तडजोड केली नाही. शेतकरी चळवळ काही वेळ बाजूला ठेवली असती आणि तडजोड केली असती तर कधीचाच आमदार -खासदार होऊन हा नेता सत्तेत बसला असता परंतु शेतकरी चळवळीत घडलेला हा बाव्वनकशी हिरा आहे आणि असा हिरा पुन्हा होणे शक्य नाही त्यामुळे या नेत्याला राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जपलं पाहिजे आणि ताकद दिली पाहिजे असे आवाहन यावेळी वव्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले.



