शिवसाई परिवार व मानस फाउंडेशन देणार शिवणकामाचे प्रशिक्षण
* ‘विधवा’ महीला रोजगारासाठी व्यवसायीकांनी पुढाकार घ्यावा- प्रा. डी. एस. लहाने
बुलढाणा
जिल्ह्यात व्यवसायिकांच जाळ मोठे आहे.व्यापर उद्दीम करतांना व्यवसायिकांना कामगारांची गरज नेहमीच भासते. जिल्ह्यात विधवा घटस्फोटीत महिलांची संख्या खूप मोठी आहे. घरातील कर्तासवर्ता पुरुष गेल्याने त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते. अशावेळी त्यांना रोजगार देण्यासाठी व्यापारी वर्गाने अनुकूलता दर्शवून पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रा. डी. एस. लहाने यांनी केले आहे.
10 डिसेंबर 2023 रोजी बुलढाणा शहरात विधवा महिला परिषद पार पडली. या परिषदेत विधवांसाठी अनेक ठराव घेण्यात आले. त्यानुसार विधवा स्वावलंबनासाठी प्रयत्न केले जाणार आहे. याचवेळी अनेक विधवा महिलांनी आपापल्या समस्या मांडल्या. त्यात महत्त्वाची समस्या आर्थिक प्रश्न भेडसावत असल्याचे अनुभव अनेकांनी मांडले. काही महिला शिक्षित आहेत. अशा महिलांना बौद्धिक क्षेत्रात काम सहज उपलब्ध होते, संधीही मिळतात. मात्र ज्या महिला जास्त शिकल्या नाहीत अशाना सर्वाधिक रोजगार समस्या भेडसावतात. अशा गरजू महिलांना व्यापारी वर्गाने रोजगाराची संधी द्यावी असे आवाहन शिवसाई परिवारचे अध्यक्ष व विधवा महिला परिषदेचे आयोजक प्रा. डी.एस. लहाने यांनी केले आहे. गाव पातळीवर विधवा महिलांचा सन्मान व्हावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढले आहे. तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. अशा महिलांना पुनर्विवाहासाठी कृतीयुक्त प्रयत्न देखील मानस फाउंडेशन व शिवसाई कडून केले जात आहेत. त्यांच्या रोजगाराचा देखील प्रश्न मार्गी लागावा म्हणून प्राध्यापक डी. एस. लहाने यांनी व्यवसायीक मंडळीं यांना आवाहन केले आहे.
* शिवणकामातून देणार रोजगार :
महिला परिषद संपल्यानंतर बुलढाणा शहरातील काही समाजाभिमुख लोकांनी शिवणकामाचे माध्यमातून विधवा महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न सुरू केले आहे. शिवणकामाचे प्रशिक्षण व त्यांनी तयार केलेले कापड येथील व्यापारी वर्गाला दिले जाणार आहे. यासाठी काही व्यापाऱ्यांशी बोलणे देखील झाले आहे. याची तयारी पूर्णत्वास आली आहे. तर लवकरच हे केंद्र बुलढाणा येथे सुरू होणार असल्याचे प्रा. डी.एस.लहाने यांनी सांगितले.