शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी प्रयत्नशील -पालकमंत्री दिलीप वळसे पाटील
बुलडाणा
राज्य शासन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कटीबद्ध आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अग्रक्रमाने देण्यात येत आहे. त्यासोबतच एक रूपयात पिक विमा, सौर कृषि पंप आणि नुकसान भरपाई देताना मदतीसाठी क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी पोलीस कवायत मैदान येथे ध्वजवंदन झाले. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून आतापर्यंत सुमारे 151 कोटी रूपये मंजूर झाले आहे. ही नुकसान भरपाई देताना तीन हेक्टरपर्यंत मर्यादा वाढविली आहे. तसेच खरीप हंगामात 1260 कोटी रूपये आणि रब्बी हंगामात 335 कोटी रूपये असे एकूण 1 हजार 600 कोटी रूपयांपर्यंत पिक कर्ज दिले आहे. खरीप हंगामात साडेसात लाख हेक्टर, तर रब्बी हंगामात तीन लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो किसान महासन्मान निधी योजनेंतर्गत प्रती वर्ष 12 हजार रूपये अर्थसहाय्य देण्यात येत आहे. जिल्ह्याची सोयाबीनची उत्पादकता ही 1500 किलो प्रती हेक्टर इतकी असून ती देशाच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा अधिक आहे, ही अभिमानाची बाब आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी 2 हजार हेक्टर जमीन प्रदान केली आहे.
जिगाव प्रकल्पाद्वारे 26 टीएमसी पाणीसाठा करून सहा तालुक्यात एक लाख दोन हजार हेक्टर सिंचनक्षेत्र निर्मितीचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. प्रकल्पासाठी 7 हजार 400 कोटी रूपये उपलब्ध झाले आहे. विविध आवास योजनेतून 17 हजार 55 घरकुलांकरीता 267 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्ह्यात 4 लाख 81 हजार 275 आनंदाचा शिधा वाटप केले आहे.
चालू वर्षात 453 कोटी रूपयांची निर्यात झाली आहे. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत 500 हून अधिक प्रस्तावांना आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. मुद्रा योजनेतून 481 कोटी रूपये इतका कर्जपुरवठा करण्यात आला आहे. पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे युवकांना सहाय्य व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येत आहे.
पर्यटन विकासासाठी नियोजन समितीमार्फत वीस कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. शासनाने 369 कोटी रूपयांचा लोणार आणि 260 कोटी रूपयांचा सिंदखेडराजा विकास आराखडा तयार केला आहे. जिल्हा नियोजन समितीतून दर्जेदार व अत्याधुनिक शैक्षणिक सोयी सुविधांकरीता सुमारे 24 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच आरोग्य सुविधांसाठी सुमारे 15 कोटींहून अधिक निधी दिला आहे. नगरोत्थान योजना, दलित वस्ती व दलितेतर विकास योजना, तांडा वस्ती विकास या योजनांकरीता सुमारे 31 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. प्रभावी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाला 16 कोटींचा निधी देण्यात आला आहेत.
युवा पिढीने व्यसनमुक्तीचा संकल्प घ्यावा, तसेच स्वच्छता, वैयक्तिक शौचालये, वसुंधरा व जल संवर्धनाची कामे हाती घ्यावीत, ग्रामीण व शहरी भागात घनता असलेल्या गावात सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न मोठा आहे. लोकसहभागाद्वारे या समस्येवर मात करणे शक्य आहे. स्वच्छ भारत मिशन, नगरोत्थान, दलित वस्ती सुधार, तांडा वस्ती, सार्वजनिक आरोग्य, मानव विकास, जनसुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यासाठी पाणीटंचाई निवारण, दुष्काळ व्यवस्थापन, मनरेगा, सामुहिक कामाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
ध्वजवंदन नंतर पालकमंत्री पाटील यांनी परेडचे निरीक्षण केले. त्यांच्या हस्ते पोलिस, क्रीडा, भुजल सर्व्हेक्षण, नगर पालिका, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच योजनांचा लाभ प्रदान करण्यात आला. महसूल, पोलिस विभागाला देण्यात आलेली वाहने सूपुर्द करण्यात आली. यावेळी आत्मनिर्भर भारत, विकसित भारतची शपथ घेण्यात आली. विविध विभागांनी माहिती देणारे चित्ररथ सादर केले. शालेय विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या. साहेबराव सोळंकी, अपेक्षा इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.