राज्यात परिवर्तनवादी चळवळीला व्यापक करणार आमदार सिद्धार्थ खरात यांचा निर्धार

राज्यात परिवर्तनवादी चळवळीला व्यापक करणार
आमदार सिद्धार्थ खरात यांचा निर्धार
आमदार पदाचा बॅच,ओळखपत्र जिजाऊसाहेबांच्या चरणी केले अर्पण
सिंदखेडराजा:: महाराष्ट्रतील राजकारणात नैतिकतेचे अधिष्ठान राहिलेलं नाही,पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा या, समाजासाठी हितकारी नसलेल्या संकल्पनेला सत्य मानून राजकारण,समाजकारणाचा स्तर जाणीवपूर्वक खालावला जातो आहे.राज्यातील हे चित्र बदलण्यासाठी आपण परिवर्तनवादी चळवळ अधिक व्यापक करणार असल्याचा निर्धार मेहकर मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार सिद्धार्थ खरात यांनी केला आहे.
विजयी झाल्या नंतर त्यांनी सभागृहात, जिजाऊ माँसाहेब यांच्यासह वारकरी चळवळीतील संत परंपरा,शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांचे स्मरण करून शपथ घेतली बुधवार 11 डिसेंबर रोजी त्यांनी राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात जावून जिजाऊंना अभिवादन केले.त्यानंतर प्रदीप बिल्लोरे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात बोलताना त्यांनी,आपण आमदार होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हत मात्र,केलेल्या प्रयत्नात जनतेने साथ दिली.निवडणुकीत देखील हा विचार घेवून आपण जनतेपर्यंत गेलो.मेहकर ही आपली कर्मभूमी आहे मात्र सिंदखेडराजा ही आपली मातृभूमी असल्याचे ते म्हणाले.याच मातृभूमीतून राज्यातील हकरलेली नैतिकता आणि समाजहिताचे अधिष्ठान पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आम्ही एकदिलाने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आपल्याला या जिजाऊ भूमीने आणि थोर महामानवाच्या विचारांनी कायम प्रेरणा दिली आहे.केवळ आमदार म्हणून काम करण्यासाठी आपल्याला जनतेने निवडून दिले नाही तर समाज एकिकरणाचा व्यापक विचार घेऊनच आपण नवं विचारांचा महाराष्ट्र घडविण्यासाठी कायम प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान,दिवंगत मुख्यमंत्री अब्दुल रहेमान अंतुले यांचे सिंदखेडराजा भेटीत आपण त्यांच्या मंचावरून जिजाऊ गीत गायल्याची आठवण या निमित्ताने करून दिली.तेंव्हा पासूनच या मातृतीर्थाचा आपल्या मनावर वैचारिक पगडा निर्माण झाला आहे.गेल्या 17 वर्षांपासून आपण 12 जानेवारी रोजी जिजाऊ भक्तांसाठी खिचडीचे वाटप करण्याचे काम करीत आहोत,उत्कर्षाच्या माध्यमातून येथे शैक्षणिक,सांस्कृतिक चळवळ उभी करण्याचे आपले स्वप्न आपण पूर्णत्वाकडे नेत आहोत हे केवळ एका व्यक्ती विषेशचे काम नसून यासाठी जिवाभावाची,चळवळीत काम करणारी सहकारी मंडळी लाभत गेली याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.जिजाऊ परिसराचा,या शहराचा विकास करण्याचे आपले ध्येय असून आज जरी आपण विरोधी पक्षात असलो तरीही सरकार आपण आहोत आलेल्या सरकारच्या माध्यमातून मेहकर आणि सिंदखेडराजा भागाचा सर्वांगीण विकासासाठी आपण आमदार मनोज कायंदे यांचे सोबत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिजाऊ राजवाडा येथे झालेल्या कार्यक्रमात अनेक नागरिक, संस्था,संघटनांच्या वतीने आमदार खरात यांचा सत्कार करण्यात आला.संत सावता माळी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले.यावेळी जाधव वंशज शिवाजी राजे जाधव,विजय तायडे,सीताराम चौधरी,सतीश काळे,प्रदीप बिल्लोरे,संजय मेहेत्रे……….यांच्यासह नागरिक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



