बातमी

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा एल्गार मोर्चा…*

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : राहुल भाऊ बोंद्रे*

*सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा एल्गार मोर्चा…*

*शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : राहुल भाऊ बोंद्रे*

बुलढाणा: महायुती सरकारकडून निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे वारंवार सांगण्यात आले. जाहीरनाम्यात सातबारा कोरा करु असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली नाही. सोयाबीन, कापूस, तुरीला हमीभाव नाही. नाफेड अंतर्गत सुरु असलेली खरेदी सरकार जाणीवपूर्वक संथ गतीने करत आहे. थकलेला पिक विमा, सिंचन अनुदान व यासह शेतकऱ्यांच्या इतर अनेक मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार ३ मार्च रोजी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केले आहे.

सोमवार ३ मार्च २०२५ पासून राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यशासना विरूध्द आंदोलन करण्यात येत आहे.

या एल्गार मोर्चात शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एन.एस.यु.आय., सेवादल, इंटक, अनुसूचित जाती विभाग, अनुसूचित जमाती विभाग, ओ.बी.सी. विभाग, अल्पसंख्यांक विभाग तसेच कार्यरत असलेले सर्व सेल यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही राहुल भाऊ बोंद्रे यांनी केले आहे.

*कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता नाही : राहुल भाऊ बोंद्रे*
शेतकऱ्यांचे अत्यंत ज्वलंत प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील महायुती शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखे अनेक आश्वासने दिलेली आहेत, मात्र त्यांच्या पुर्ततेसाठी राज्य शासनाकडून कोणतेही प्रयत्न सुरू नाहीत. तसेच शेतकऱ्यांचे हमीभाव थकलेला पीकविमा यासह इतर अनेक प्रश्न असून त्याकडे राज्यशासन सतत दुर्लक्ष करीत आहे. या कारणास्तव शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचे माजी आमदार राहुल बोंद्रे म्हणाले.

 

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button