विधवा परिचय मेळाव्यात फुलले दोन जीवांचे संसार

शिक्षणामुळे महिला आत्मनिर्भर बनू शकतात- आ. श्वेताताई महाले
मुलींना शिक्षित केले पाहिजे, शिक्षणाने महिला आत्मनिर्भर होऊ शकतात. कोणत्याही अडीअडचणी आल्या तर त्याला सामोरे जाण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे. असे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी केले.

सावित्रीबाई फुले जयंतीच्या औचित्यावर जिजाऊ इंग्लिश स्कूल चिखली येथे आज विधवा परिचय मेळावा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. श्वेता महाले होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी, विधवा विवाहाचे संकल्प डी एस लहाने, आयोजक पंडितराव देशमुख, प्रा. नरेंद्र खेडेकर, मनोज दांडगे ,डॉ. सत्येंद्र भुसारी, डॉ. वसंतराव चिंचोले, प्रा. विष्णूपंत पाटील, प्रा. शाहीनाताई पठाण ,पत्रकार गणेश निकम, सलीम मेमन, सुधीर चेके पाटील, सुरेश साबळे,प्रमोद झिंजार्डे, डॉ. प्रकाश शिंगणे, दीपक मस्के, अश्विनी सोनवणे, प्रतिभा भुतेकर,स्वाती साबळे आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांनी सावित्रीबाई फुले व महापुरुषांचे पूजन केले. पुढे बोलताना आ. श्वेताताई म्हणाल्या -विधवा महिलांच्या समस्यावर आता चर्चा होत आहे, ही समाधानाची बाब आहे. बुलढाणातून यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी प्रा. डी एस लहाने यांचे कौतुक केले. ही भूमी बदल घडवणारी आहे. महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. शिक्षण हेच त्यांच्या समस्यावर उत्तर आहे. असे सांगून त्यांनी वाढती व्यसनाधीनता व कौटुंबिक अडचणी यावर भाष्य केले. प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक पंडितराव देशमुख यांनी केले. यावेळी त्यांनी आयोजनामागची भूमिका मांडली. प्रसंगी प्रा. नरेंद्र खेडेकर यांनीही विचार मांडले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमोद झिंजर्डे यांना सामाजिक कृतज्ञात पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संचलन डॉ. भुसारी यांनी केले.
महिलांनो बंधनात अडकू नका- एएसपी महामुनी
पारंपारिक बंधने यात महिला अडकून पडतात. अशा बंधनात अडकू नका, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मुक्तीचा मार्ग दिला आहे. त्यामुळे स्वतःला एकटे समजू नका, प्रशासन आपल्या सोबत असल्याची हमी ए एस पी महामुनी यांनी दिली. यावेळी महामुनी यांनी विधवा विवाहासाठी झालेल्या प्रयत्नांची माहिती दिली. चिखलीत झालेला विधवा मेळावा ही खरी सावित्रीबाई फुले जयंती असल्याचे त्यांनी सांगितले.
खंबीर व्हा, लढा द्या-डी एस लहाने
विधवा महिलांनो खंबीर व्हा व आपल्या हक्कासाठी संघर्ष करा, जोडीदार शोधणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. यात सामाजिक मानसिकता हा मोठा अडसर असला तरी आपला निर्णय खंबीरपणे घ्या असे आवाहन विधवा विवाहाचे संकल्पक प्रा. डी एस लहाने यांनी केले. परिचय मेळाव्यात आलेल्या दोन विधवा व विधुर जोडप्याने लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्राध्यापक डीएस लहाने यांनी स्टेजवर त्यांचा साखरपुडा देखील उरकला.विधवा मेळाव्याचे हे फलित मानले जाते. प्रसंगी 150 पुरष तर 99 विधवा महिलांनी विवाहासाठी नोंदणी केली.



