बातमी
शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे – सुरेंद्र अवाना* अभिता ऍग्रो एक्स्पो : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे थाटात उदघाटन

जैविक शेतीमुळे पाण्याची बचत होते. जमिनीचे स्वास्थ चांगले राहते. परिणामी अधिक उत्पन्न मिळते. जैविक उत्पादने आरोग्यास लाभदायी असतात. येणारा काळ जैविक शेतीचा असून शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे, असे आवाहन राजस्थान मधील प्रगतीशील शेतकरी सुरेंद्र आवाना यांनी केले.

राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त १२ जानेवारी २०२४ रोजी आयोजित राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनाचे दुपारी १ वाजता थाटात उद्धाटन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बियाणे उत्पादक सुखजितसिंग भंगू (पंजाब), बियाणे उत्पादक प्रीतम सिंग (हरियाणा), प्रसिद्ध केळी उत्पादक धीरेंद्रकुमार देसाई (गुजरात), नारळ व सुपारी व्यावसायिक पांडुरंग पाटील (गोवा), मृद व जलसंधारण अभियांत्रिकी शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुमार मिश्रा (नवी दिल्ली), पोल्ट्री फार्म व्यावसायिक रवींद्र मेटकर (अमरावती), अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कृषी प्रदर्शनाचे उदघाटन अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके होत्या. यावेळी नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष छगन मेहेत्रे, देविदास ठाकरे, मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे, संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे, राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना सुरेंद्र आवाना म्हणाले, राजस्थानमध्ये तुलनेने कमी पाऊस पडतो. शेतकऱ्यांना दुष्काळी संकटांचा सामना करावा लागतो. मात्र तरी सुद्धा एकही शेतकरी आत्महत्या करीत नाही. कारण तेथील शेतकरी शेतीपूरक व्यवसाय करतात. जोडधंदा म्हणून पशुपालन, दुघव्यवसाय, बियाणे उत्पादन, फळबाग लागवड करतात. विविध मार्गानी त्यांना उत्पन्न मिळते. त्यामुळे आर्थिक समस्या राहत नाही. शेतकऱ्यांनी एकीकृत शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करावा, असेही सुरेंद्र आवाना यावेळी बोलतांना म्हणाले.
सिंचन संस्कृती निर्माण केल्याशिवाय आपल्या जीवनात समृद्धी येऊ शकत नाही, असे प्रतिपादन जलतज्ञ सुधाकर चौधरी यांनी केले. आपल्या उत्पादनांची मार्केटिंग आपणास करता आली पाहिजे. इतरांवर अवलंबून राहून जमणार नाही. शेतकऱ्यांनी ही कला अवगत करुन घ्यावी. मालाची विक्री करता येत असेल तरच उत्पादन घ्यावे, असा सल्ला हरियाणामधील बियाणे उत्पादक प्रीतम सिंग यांनी दिला. पंजाबमधील बियाणे उत्पादक तथा प्रगतिशील शेतकरी सुखजितसिंग भंगू यांनी आपले अनुभव कथन केले. अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी राजे लखुजी जाधव यांच्या काळातील सिंचनाच्या सोयीबाबत सांगून सिंडखेड राजाची सिंचन संस्कृती अधोरेखित केली. संचलन क्षिप्रा मानकर यांनी केले. प्रास्ताविक आणि आभार मेहेत्रे सर यांनी मानले.
शाहीर राजेंद्र कांबळे यांनी आपल्या पहाडी आवाजात महामानवांवरील शाहिरी सादर केली. प्रारंभी महानायिकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. राज्य शासनाचा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने अभिता ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीने अभिता ऍग्रो एक्स्पो हे कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. येथील मातोश्री लॉन्सच्या बाजूला १२ ते १५ जानेवारी २०२४ पर्यंत हे कृषी प्रदर्शन चालणार आहे. शेतकरी, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन- जयश्रीताई शेळके
सरकारचे दुर्लक्ष आणि निसर्गाची अवकृपा अशा दुहेरी संकटात जगाचा पोशिंदा शेतकरी अडकला आहे. मात्र याची पर्वा न करता शेतकरी आपले काम इमानदारीपूर्वक करीत राहतो. शेतकरी शेती पिकवतो म्हणून आपणास धान्य मिळते. शेतकऱ्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी सिंदखेड राजा येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई शेळके यांनी केले.



