*पावसाअभावी पिके सुकू (करपू) लागली* ; *शेतकरी चिंतातुर*
*आभाळाकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा; मजुरांवरही उपासमारीची वेळ*

*पावसाअभावी पिके सुकू (करपू) लागली* ; *शेतकरी चिंतातुर*
*आभाळाकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा; मजुरांवरही उपासमारीची वेळ*
**मोताळा* , प्रतिनिधी*शेख अफसर दिनांक २४/८/२०२६: मोताळा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेली पिके आता पाण्याअभावी सुकू लागली असून शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. आकाशात ढग जमा होत असले तरी दमदार पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा सतत आभाळाकडे लागल्या आहेत.
तालुक्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी केली. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकांना चांगली उगवण मिळाली; मात्र त्यानंतर पावसाने मोठी उघडीप दिल्याने कापूस ,सोयाबीन, मका, तूर या पिकांची वाढ खुंटली आहे. जमिनीतील ओलावा कमी होत असून कोवळी पिके माना टाकू लागली आहेत. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पावसाअभावी केवळ शेतकरीच नव्हे, तर शेतमजुरांसमोरही रोजगाराचे संकट उभे राहिले आहे. शेतातील मशागतीची तसेच इतर कामे ठप्प झाल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न मजुरांसमोर निर्माण झाला आहे.
“पाऊस वेळेवर झाला नाही तर पिकांचे मोठे नुकसान होईल. बियाणे, खत आणि मशागतीवर झालेला खर्चही वसूल होणे कठीण आहे,” अशी चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
आता दमदार पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा असून “पाऊस कधी येणार?” याकडे शेतकरी आणि शेतमजुरांचे लक्ष लागले आहे.



