शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून नोकरी प्राप्त युवक-युवती, व पालकांचा ६ जून रोजी भव्य सत्कार

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून नोकरी प्राप्त युवक-युवती, व पालकांचा ६ जून रोजी भव्य सत्कार
धाड, : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून वत्सलाबाई दांडगे बहुउद्देशीय संस्था, जामठी (धाड) तसेच जन्मभूमी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने,मासरूळ जिल्हा परिषद सर्कल व परिसरातील विविध शासकीय क्षेत्रांमध्ये नोकरी प्राप्त युवक-युवती, व त्यांच्या पालकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजता ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालय, जामठी रोड, धाड येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शिवराज्याभिषेक दिन हा स्वाभिमान, पराक्रम, दूरदृष्टी आणि कर्तृत्वाचा प्रेरणादायी दिवस मानला जातो. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून आपल्या कर्तृत्वाने यश संपादन केलेल्या युवक-युवतींचा गौरव करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांमध्ये नोकरी प्राप्त करून यशाची नवी वाट निर्माण करणाऱ्या युवक-युवतींचा विशेष सत्कार करण्यात येणार असून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचाही सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार आणि स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे करताना युवकांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली. त्याच प्रेरणेतून आजची युवा पिढी शिक्षण, रोजगार आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. या कर्तृत्ववान युवक-युवतींच्या यशाचा गौरव करून समाजासमोर आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, पालक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी युवक-युवतींना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक तथा वत्सलाबाई दांडगे बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच जन्मभूमी अर्बनचे अध्यक्ष,मनोज ज्ञानदेवराव दांडगे यांनी केले आहे..



