बातमी

भक्तीला स्वच्छतेची जोड:- देवानंद पवार फाउंडेशनच्या माध्यमातून पालखी मार्ग व सप्तऋषी मंदिर परिसरात राबविली स्वच्छता मोहीम….

१०० हून अधिक वारकऱ्यांसह माधुरी पवारांनी पालखी मार्गाची केली स्वच्छता....

भक्तीला स्वच्छतेची जोड:- देवानंद पवार फाउंडेशनच्या माध्यमातून पालखी मार्ग व सप्तऋषी मंदिर परिसरात राबविली स्वच्छता मोहीम….

१०० हून अधिक वारकऱ्यांसह माधुरी पवारांनी पालखी मार्गाची केली स्वच्छता….

२५ महिला वारकऱ्यांच्या सहभागातून सप्तऋषी मंदिराचा परिसरही केला स्वच्छ…..

भक्ती,श्रद्धा आणि अध्यात्म यांना सामाजिक बांधिलकीची जोड देत देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहेत. भक्ती ही केवळ देवदर्शनापुरती मर्यादित नसून आपल्या परिसराची स्वच्छता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडण्यातही खरी भक्ती आहे, या भावनेतून फाउंडेशनचे संस्थापक देवानंद पवार आणि त्यांच्या कन्या ॲड.माधुरी देवानंद पवार यांच्या पुढाकारातून पालखी मार्ग तसेच पंचक्रोशीतील सप्तऋषी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती प्राप्त श्री शेगावीचा राणा श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने १९ ऑगस्ट रोजी खामगाव ते शेगाव या सुमारे २५ किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्यात देवानंद पवार यांच्या नेतृत्वात फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी आणि १०० हून अधिक वारकऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. पंढरपूरहून शेगावकडे परतीच्या प्रवासात श्रीसंत गजानन महाराजांची पालखी या मार्गाने मार्गस्थ होत असतांना लाखो भाविकांचा सहभाग असतो.मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने मार्गावर निर्माण होणारा कचरा लक्षात घेता पालखीचा मार्ग स्वच्छ ठेवण्याचा संकल्प देवानंद पवार फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला.
स्वतः देवानंद पवारांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत रस्त्यावरील कचरा गोळा केला.त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी आणि वारकऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत पालखी मार्ग स्वच्छ केला. पालखी मार्गावरील स्वच्छतेचा हा उपक्रम पाहून भाविकांनी आणि स्थानिक नागरिकांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.भक्तीच्या वातावरणात स्वच्छतेचा संदेश देणारा हा उपक्रम मातृतीर्थ बुलडाणा जिल्हा वासियांसाठी विशेष आकर्षक ठरला.

याच सेवाभावी भावनेचा विस्तार करत ॲड. माधुरी देवानंद पवार यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील सप्तऋषी मंदिर परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मंगळवारी देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने २५ महिला वारकऱ्यांना सोबत घेत देळप आणि गोमेधर येथील सप्तऋषी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली.
सप्तऋषी मंदिरांना पंचक्रोशीतील धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.विशेषतः श्रावण महिन्यात भगवान महादेवाची भक्ती करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिरांमध्ये दर्शनासाठी येतात. स्थानिक भाविकांसोबतच दूरवरुनही अनेक भक्त सप्तऋषींच्या दर्शनासाठी या परिसरात येतात. त्यामुळे या धार्मिक स्थळांचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि भक्तिमय ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे प्राथमिक कर्तव्य आहे,अशी भावना माधुरी ताईंनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.
श्रावण महिन्यात मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ वाढते. पूजा साहित्य,फुलं,नारळ तसेच इतर साहित्यामुळे मंदिर परिसरात कचरा निर्माण होतो.हा कचरा वेळेवर साफ न झाल्यास धार्मिक स्थळाच्या परिसराच्या सौंदर्यावर विपरीत परिणाम होतो.ही बाब लक्षात घेऊन माधुरी ताईंनी महिला वारकऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम हाती घेतली.या मोहिमे दरम्यान मंदिर परिसर,दर्शन मार्ग तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. महिला वारकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत परिसरातील कचरा गोळा करुन स्वच्छता केली. या उपक्रमातून ‘देवाच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी देवाचा परिसर स्वच्छ ठेवणे ही देखील सेवा आहे,’ असा संदेश भाविकांना देण्यात आला.
देवानंद पवार आणि ॲड. माधुरी देवानंद पवार यांच्या सामाजिक कार्याची परंपरा या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली.वारकरी सेवा,सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन आणि महिला सहभाग या विविध माध्यमातून पवार कुटुंबीय सातत्याने समाजाशी जोडलेले आहेत.
यापूर्वी सुध्दा १५ ऑगस्ट रोजी श्रीसंत गजानन महाराजांची पालखी जानेफळ परिसरातून जात असताना देवानंद पवार यांच्या पुढाकारातून पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले होते. यावेळी श्रींच्या पालखीवर तब्बल १०० किलो गुलाब पुष्पांची पुष्पवृष्टी करण्यात आली.भाविकांनी मोठ्या उत्साहात या स्वागत सोहळ्यात सहभाग घेतला.
वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत ॲड.माधुरी पवार यादेखील विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने गेल्या सात ते आठ वर्षांपासून दरवर्षी मेहकर आणि लोणार तालुक्यातील सुमारे दीड लाख भावांना राखी पाठविण्याचा उपक्रम त्या राबवितात.सामाजिक बांधिलकी आणि बहीण भावाच्या आपुलकीच्या नात्याला त्यांनी या उपक्रमातून वेगळे स्वरुप दिले आहे.
पालखी मार्गाची स्वच्छता असो,सप्तऋषी मंदिर परिसराची स्वच्छता असो किंवा सामाजिक बांधिलकी जपणारे इतर उपक्रम असोत,देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून ‘सेवा हीच खरी भक्ती’ हा विचार प्रत्यक्ष कृतीतून रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
धार्मिक स्थळे ही आपल्या श्रद्धेची केंद्रे आहेत. त्यामुळे ती स्वच्छ ठेवणे, तेथे येणाऱ्या भाविकांना स्वच्छ आणि सुंदर वातावरण मिळवून देणे तसेच स्वच्छतेची सवय समाजात रुजविणे,ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.याच भावनेतून राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेला भाविक,महिला वारकरी आणि स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भक्तीच्या मार्गावर स्वच्छतेची सेवा आणि समाजाच्या सेवेतून श्रद्धेची अभिव्यक्ती,या विचारांनी देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेले हे उपक्रम पंचक्रोशीतील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाच्या कौतुकाचा विषय ठरत आहेत.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button