बातमी

मेहकरच्या नागरी समस्या तातडीने सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू— माजी नगराध्यक्ष कासम गवळींचा इशारा…..

मेहकरच्या नागरी समस्या तातडीने सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू— माजी नगराध्यक्ष कासम गवळींचा इशारा…..

अतिक्रमण हटविलेल्या व्यावसायिकांना १ सप्टेंबरपूर्वी गाळ्यांचा ताबा न दिल्यास जुन्याच जागेवर अतिक्रमण धारकांना दुकाने बांधायला लावणार….

 

मेहकर
मेहकर शहरातील विविध नागरी समस्या तातडीने सोडवाव्यात तसेच मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यामुळे विस्थापित झालेल्या व्यावसायिकांसाठी बांधण्यात आलेल्या गाळ्यांचा ताबा १ सप्टेंबर पूर्वी त्वरित द्यावा, अन्यथा जुन्याच जाग्यावर अतिक्रमणधारकांना त्यांची दुकाने बांधून देण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू असा गर्भगळीत इशारा माजी नगराध्यक्ष कासम गवळी यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. यासंदर्भात त्यांनी मेहकर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन दिले.
सुमारे दीड वर्षापूर्वी नगर परिषद प्रशासनाने मुख्य रस्त्यावरील व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविले होते. त्यानंतर संबंधित व्यावसायिकांसाठी गाळे बांधण्यात आले; मात्र अद्याप त्यांना गाळ्यांचा ताबा देण्यात आलेला नाही.त्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचा रोजगार हिरावला असून त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावून उपासमारीची पाळी आलेली आहे.पात्र व्यावसायिकांना पारदर्शक पद्धतीने गाळ्यांचे वाटप करुन १ सप्टेंबर २०२६ पूर्वी ताबा देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी माजी नगराध्यक्ष कासम गवळी यांनी निवेदनात केली आहे.
तसेच मेहकर शहरात पिण्याच्या पाण्याचा नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा,पाण्याची गुणवत्ता तपासून आवश्यक प्रमाणात तुरटी,ब्लिचिंग पावडर व जंतुनाशकाचा वापर करावा,अशीही मागणी करण्यात आली आहे.शहरातील उघड्या नाल्या व चेंबर तातडीने बंद करुन संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक प्रभागात नियमित स्वच्छता मोहीम राबवावी.डेंग्यू,मलेरिया आणि इतर साथींच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जंतुनाशक व कीटकनाशक फवारणी करावी.तसेच प्रत्येक प्रभागात घंटागाडी पाठवून नियमित कचरा संकलनाची व्यवस्था करावी,अशीही मागणी माजी नगराध्यक्ष कासम गवळी यांनी केली आहे.
शहरातील मोकाट कुत्रे आणि जनावरांमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून मोकाट कुत्र्यांच्या प्रश्न निर्माण झाला असून याचा तातडीने बंदोबस्त करावा. मुख्य रस्त्यांच्या कडेला वाढलेली काटेरी व धोकादायक झाडेझुडपे हटवून रस्ते पादचारी आणि वाहन चालकांसाठी सुरक्षित करावेत,ही मागणी करण्यात आलेली आहे.
या सर्व समस्या नागरिकांच्या आरोग्याशी, सुरक्षिततेशी आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. नगर परिषद प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन ठोस कार्यवाही करावी.निर्धारित मुदतीत कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या सहभागातून शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन व महामोर्चा आयोजित करण्यात येईल, असा सज्जड इशारा माजी नगराध्यक्ष कासम गवळी यांनी दिला आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button