आदिवासी तरुणी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा ! दोषींवर कठोर कारवाई व्हावी !! आमदार रोहित पवार यांची मागणी…

आदिवासी तरुणी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा !
दोषींवर कठोर कारवाई व्हावी !!
आमदार रोहित पवार यांची मागणी….
जळगाव ( जामोद) : प्रतिनिधी
तालुक्यातील आदिवासी भागात सापडलेल्या एका तरुणीच्या कथित हत्येच्या प्रकरणावरून सोमवारी (दि. २ जून) स्थानिक पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, दि. २६ एप्रिल रोजी तालुक्यातील आदिवासी भागात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक होती. तिचा गळा चिरलेला होता तसेच कमरेच्या वरचा भाग जाळण्यात आल्याचे दिसून आले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांचा तपास मध्यप्रदेशातील एका गावापर्यंत पोहोचला, जिथे एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणीच्या वडिलांना आणि भावाला चौकशीसाठी महाराष्ट्रात आणले.
यावेळी रोहित पवार यांनी आरोप केला की, काही व्हिडिओ आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तरुणीच्या वडिलांना व भावाला कथितरीत्या मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्यावर दबाव टाकून सापडलेला मृतदेह त्यांच्या मुलीचाच असून तिची हत्या त्यांनीच केल्याची कबुली देण्यास भाग पाडण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाचा एक कथित घटनाक्रमही तयार केल्याचा आरोप त्यांनी केला.
मात्र, दि. २८ मे रोजी या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले. संबंधित तरुणी स्वतः जिवंत अवस्थेत पोलीस ठाण्यात हजर झाली. सोशल मीडियावरून तिच्या कथित हत्येप्रकरणी तिच्या वडिलांना आणि भावाला आरोपी ठरविण्यात आल्याची माहिती तिला मिळाली होती. तरुणी समोर आल्यानंतर संपूर्ण तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रोहित पवार म्हणाले की, जर पुरेशा पुराव्यांशिवाय एका निरपराध आदिवासी कुटुंबाला आरोपी ठरवून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असेल, तर ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली.
यावेळी त्यांनी असा आरोपही केला की, जळगाव जामोद परिसरात सामान्य नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार समोर येत आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी गृह विभागाने अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही पत्रकार परिषदेत पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. दि. २६ एप्रिल रोजी सापडलेल्या मृतदेहाची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसताना संबंधित तरुणी जिवंत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे, तसेच निरपराध व्यक्तींना तब्बल २० दिवस तुरुंगात ठेवण्यास जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेला आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिलाध्यक्ष प्रसेनजीत पाटील, काँग्रेसच्या महासचिव डॉ. स्वाती वाकेकर, उबाठा जिलाप्रमुख गजानन वाघ, काँग्रेस जिलाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



