नगरसेवक दळवींसह १५ जणांवर घरात घुसून विनयभंग व लुटीचा गुन्हा

नगरसेवक दळवींसह १५ जणांवर घरात घुसून विनयभंग व लुटीचा गुन्हा ;
तर वैयक्तिक भांडणात आ. महाले यांचे नाव नाहक घेऊन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न
बुलढाणा, दि. ११ (प्रतिनिधी) : कारंजा चौक, तिरुपती मंगल कार्यालय परिसरात दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता घडलेल्या प्रकारात महिलेचा विनयभंग करून घरात लूटमार केल्याप्रकरणी नगरसेवक आकाश दळवी व प्रकाश उर्फ टिल्लू गोरले यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील फिर्यादी महिला यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिस सूत्रानुसार, दि. ८ सप्टेंबर रोजी गोगाजी महाराजांची मिरवणूक पाहून शर्मा कुटुंबीय घरी परतले असताना हा प्रकार घडला. घरासमोर उभी असलेली दुचाकी खाली पाडून नुकसान केल्यानंतर घाबरलेल्या कुटुंबाने दरवाजा बंद केला. आरोपींनी दरवाजा तोडून घरात प्रवेश करून कुटुंबाला मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. भांडण सोडविण्यासाठी पुढे आलेल्या महिला यांचा हात धरून विनयभंग केल्याचा व घरातील २० हजार रुपये जबरदस्तीने लुटून नेल्याचा आरोप फिर्यादीत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय जांगिड ब्राह्मण महासभा दिल्ली, जिल्हा सभा बुलढाणा चे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश टिकूराम शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आज दि. ११ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, दळवी व त्यांच्या साथीदारांनी १० ते १५ मिनिटे घरात हैदोस घालून महिलेसोबत गैरवर्तन केले. त्यानंतर कुटुंबाने आत्मरक्षणासाठी घरातील पारंपारिक नवरात्रीतील दुर्गा पूजेची तलवार काढताच आरोपी पळून गेले.
या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, दळवी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी निखिल शर्मा यांना त्यांच्या दोन्ही मुलांसह अटक केली आहे. आज त्यांच्या रवानगी न्यायालयाच्या आदेशाने कारागृहात करण्यात आली आहे.
पीडित कुटुंबावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करून सकाळी ६ वाजता अटक केली असताना पोलीस दप्तरी वेळ दुपारी ४ वाजेची दाखविल्याचा व चार भिंतीच्या आत झालेल्या वैयक्तिक भांडणात अॅट्रॉसिटीचा गुन्हा लावल्याचा आरोप महासभेने केला आहे. आरोपी आजही राजरोसपणे बाहेर फिरत असून पीडित कुटुंबच तुरुंगात असल्याने एकतर्फी कारवाई होत असल्याची भावना समाजात आहे.
राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार
या संपूर्ण प्रकरणात दळवी यांनी त्यांच्या मित्रांच्या वैयक्तिक भांडणात आमदार महाले यांचे नाव नाहक घेऊन राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार केल्याचे आरोप करण्यात येत आहे. प्रत्यक्षात निखिल शर्मा कुटुंबाच्या फिर्यादीत कोणत्याही राजकीय व्यक्तीचा उल्लेख नसताना, दळवी यांनी या वादाला राजकीय रंग दिल्याचे दिसून येत आहे.
यासंदर्भात बुलढाणा शहर ठाणेदार संग्राम पाटील यांनी सांगितले की, सदर फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असून फरार आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच फरार आरोपींना अटक केली जाईल.
दरम्यान, या प्रकरणात पीडित महिलेला न्याय मिळावा व निखिल शर्मा व त्यांच्या मुलांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली असून अन्यथा राज्यव्यापी लोकतांत्रिक आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.



