बातमी

सामाजिक न्याय विभागाचा रु. ३४४.७४ कोटींचा निधी वळवू नका

*सामाजिक न्याय विभागाचा रु. ३४४.७४ कोटींचा निधी वळवू नका*

*शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक; मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे निधी पूर्ववत करण्याची मागणी*

बुलढाणा, दिनांक ३१ ऑगस्ट : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा रु. ३४४.७४ कोटींचा निधी वळविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला असून, सदर निधी तात्काळ पूर्ववत करून अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या विकासासाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक न्याय आघाडीचे बुलढाणा जिल्हा उपप्रमुख मिलिंद गवई यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले.

सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, नवबौद्ध तसेच वंचित घटकांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृहे, शैक्षणिक सुविधा, कौशल्य विकास व आर्थिक सक्षमीकरणाच्या विविध योजना राबविल्या जातात. या समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी मंजूर झालेला निधी अन्यत्र वळविणे म्हणजे त्यांच्या विकासाच्या संधींवर परिणाम करणारे पाऊल आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही; मात्र त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा समाजाच्या हक्काचा निधी वळविण्यास आमचा ठाम विरोध आहे. महिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी शासनाने स्वतंत्र व पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. एका घटकाला मदत देताना दुसऱ्या वंचित घटकाच्या हक्काच्या निधीवर गदा आणणे योग्य नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय विभागाचा निधी भविष्यात इतर योजनांसाठी वळविला जाऊ नये, याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे. तसेच यापूर्वी झालेल्या निधी वळतेकरणाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून लेखाशीर्षनिहाय मंजुरी व खर्चाची माहिती सार्वजनिक करावी, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

“समाजाच्या हक्काचा निधी समाजाच्या विकासासाठीच वापरला पाहिजे,” अशी ठाम भूमिका मांडत शासनाने या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास या अन्यायाविरोधात लोकशाही व संविधानिक मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी शहर संपर्कप्रमुख सुनील भाग्यवंत, शहरप्रमुख विजय राऊत, सामाजिक न्याय आघाडी जिल्हाप्रमुख मिलिंद गवई, मनोज चंदन, सामाजिक न्याय आघाडी उपतालुकाप्रमुख श्रीकांत जाधव, मनोज चंदन, महिलाआघाडी तालुकाप्रमुख अनिता जाधव, उपतालुकाप्रमुख भावना पाटील, सुनंदा खरात, भारती डागोर, वैशाली मिसाळ, शारदा दाभाडे, नीता चव्हाण, सुवर्णा जाधव, रूपाली चव्हाण, रोशनी गरड, सविता राऊत, सुनिता दराखे, स्वाती लोंढेकर, पूजा शिंगणे, सपना इंगळे, शितल सुरडकर, वंदना मेढे, ज्योती गायकवाड, गंगा काकडे
उज्वला हिवाळे, मालती गवई, कल्पना गाडेकर, सुनीता तायडे, सुमन भालेराव, शांता गवई, विद्या गाडेकर, देवका गवई, नेहा खराटे, गोकुर्णा सुपाडा खराटे, रेखा सोमस, रंजना मोरे, वंदना गाडेकर, राधा सोमस, आशा गाडेकर, विमलगाडेकर, बेबा गाडेकर, गजानन गवई यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button