अमडापूर येथे शिवसेना शेतकरी, महिला परिषद उत्साहात संपन्न

अमडापूर येथे शिवसेना शेतकरी, महिला परिषद उत्साहात संपन्न
‘लाडकी बहीण’च्या धर्तीवर ‘माझा बळीराजा’ योजना राबवून पेरणीपूर्वी दरवर्षी एकरी ₹१० हजार अनुदान द्यावे — शिवसेना शेतकरी परिषदची ठाम मागणी
अमडापूर, दि. ४ ऑक्टोबर :
अमडापूर येथील अंबामाता मंदिराच्या चरणी, बल्लाळ देवी देवस्थान सभागृहात राज्यस्तरीय शिवसेना शेतकरी व महिला मेळावा तसेच ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
राज्यभर दुष्काळाचे सावट असल्याने यंदा कार्यक्रमात अनावश्यक सत्कार, हार-तुरे व शाल स्वीकारण्याऐवजी पारंपरिक वारकरी भजनाच्या माध्यमातून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना शेतकरी परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा. शंकरअण्णा धोंडगे, माजी आमदार यांचे तसेच मेळाव्याचे उद्घाटक युवा शेतकरी नेते मा. कुणालदादा गायकवाड आणि राज्याचे उपाध्यक्ष मा. भैय्यासाहेब पाटील यांचे आगमन स्वागत बैलजोडी देऊन करण्यात आले.
यानंतर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मा. भैय्यासाहेब पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकरी व महिलांना अशा मेळाव्यांमधून आणि शासनाच्या विविध योजनांच्या कार्यशाळांमधून जगण्याचे बळ मिळते, असे सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील चांगेफळ, ता. सिंदखेडराजा येथे यापूर्वी विदर्भस्तरीय शेतकरी मेळावा घेण्यात आला असून, त्यानंतर अमडापूर येथे राज्यस्तरीय मेळावा आयोजित केल्याबद्दल त्यांनी शिवसेना शेतकरी परिषदच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
मेळाव्याचे उद्घाटन युवा शेतकरी नेते मा. कुणालदादा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी, महिला, वारकरी आणि भजनी मंडळांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी लोकप्रिय आमदार मा. संजयभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिवसेना शेतकरी परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा. शंकरअण्णा धोंडगे यांच्या हस्ते विविध पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश व नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
– श्री. रामभाऊ शिंदे पाटील — शिवसेना शेतकरी परिषद राज्य कार्यकारिणी सदस्य तथा पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख
– सौ. वंदनाताई वाघ — बुलढाणा जिल्हा महिला अध्यक्ष
– श्री. भानुदास शेजूळ — सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष
– कु. श्रावणीताई पाटील — बुलढाणा तालुका महिला अध्यक्षा
– श्री. विजयराव काळे यांचाही पक्षप्रवेश करण्यात आला.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘माझा बळीराजा’ योजनेची मागणी
यावेळी शिवसेना शेतकरी परिषदच्या वतीने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली.
‘लाडकी बहीण’ योजनेच्या धर्तीवर ‘माझा शेतकरी बळीराजा’ योजना सुरू करून प्रत्येक शेतकऱ्याला पेरणीपूर्वी दरवर्षी प्रती एकर ₹१०,०००/- अनुदान सरसकट देण्यात यावे, अशी ठाम मागणी प्रदेशाध्यक्ष मा. शंकरअण्णा धोंडगे यांनी केली.
पेरणीपूर्वी मिळणारी ही मदत शेतकऱ्यांना बियाणे, खते, मशागत व इतर शेती खर्चासाठी मोठा आधार ठरू शकते. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका परिषदेकडून मांडण्यात आली.
शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन — संघटनेचा विश्वास
शिवसेना शेतकरी परिषद मा. ना. श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर शेतकरी हितासाठी कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विविध भागात दौरे करण्यात आले असून, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुके यादीत समाविष्ट झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
मा. संजयभाऊ गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे साहेबांचा पीक नुकसान पाहणी दौरा बुलढाणा जिल्ह्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला, असे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी, महिला, वारकरी आणि भजनी मंडळांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची माहिती व मार्गदर्शन कार्यशाळेत देण्यात आले.
मेळाव्याच्या शेवटी उपस्थित हजारो शेतकरी व महिलांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. राज्यस्तरीय शेतकरी व महिला मेळाव्यामुळे अमडापूर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



