राजकीय बातमी

जालिंदर बुधवत यांची संचालकपदी बिनविरोध निवड

जालिंदर बुधवत यांची संचालकपदी बिनविरोध निवड

बुलढाणा
बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत व्हीजेएनटी अर्थात विमुक्त जाती-भटक्या जमाती राखीव मतदार संघातून शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांची बिनविरोध निवड झाली आहे. अर्ज मागे घेण्याच्या 11 ऑगस्ट रोजी अंतिम दिवशी तब्बल नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याने बुधवत यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

व्हीजेएनटी मतदार संघातून गणपत कुसळकर, किरण विनायक राठोड, जंगलसिंग राठोड, रामविजय बुरुंगले, उषा भगवान मुंडे, हिरासिंग घोती, उज्वला गणेश मोरे, गणेश मुख्त्यारसिंग मोरे, शिवराज तोताराम कायंदे यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतल्याने जालिंदर बुधवत यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली.

* ‘शांतीत क्रांती’ची राजकीय शैली
जालिंदर बुधवत यांच्या राजकीय वाटचालीत त्यांची ‘शांतीत क्रांती’ करणारा नेता अशी ओळख निर्माण झाली आहे. कोणताही गाजावाजा न करता राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळविण्याची त्यांची शैली या निवडणुकीतही दिसून आली.

मासरूळ जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी कमलताई बुधवत यांनी जोरदार लढत देत विजय मिळविला होता. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली. जालिंदर बुधवत यांनी सोयगावचे माजी सरपंच, शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच दोन वेळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम करत जिल्ह्यातील राजकारणात आपली पकड मजबूत केली आहे.

* सहकार क्षेत्रातील प्रवेशाने राजकीय वजन वाढणार

बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने बुधवत यांच्या राजकीय कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला गेला आहे. सहकार क्षेत्रातील या महत्त्वाच्या संस्थेत प्रवेश मिळाल्याने त्यांच्या राजकीय वजनातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘मातोश्री’च्या अत्यंत जवळचे म्हणूनही जालिंदर बुधवत यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील त्यांची बिनविरोध निवड ही केवळ सहकार क्षेत्रातील यश नसून आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. जालिंदर बुधवत यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. समर्थकांनी जल्लोष करत बुधवत यांचे अभिनंदन केले.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button