बातमी

चिमुकल्यांचा आत्मविश्वास फुलला; बालसभेत कलागुणांचे रंगले बहारदार सादरीकरण!

ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालयात बालसभा उत्साहात संपन्न

चिमुकल्यांचा आत्मविश्वास फुलला; बालसभेत कलागुणांचे रंगले बहारदार सादरीकरण!

ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालयात बालसभा उत्साहात संपन्न

धाड : विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या सुप्त प्रतिभेला वाव मिळावा, त्यांच्या कलागुणांचे योग्य पोषण व्हावे तसेच त्यांना आवश्यक मार्गदर्शन व दिशा मिळून व्यक्तिमत्त्वाचा विधायक विकास व्हावा, या उद्देशाने ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालय, धाड येथे बालसभेचे आयोजन करण्यात आले. या बालसभेत नर्सरी ते केजी-२ तसेच इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डवले सर होते. यावेळी उपप्राचार्य जाधव सर, चव्हाण सर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.

बालसभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासोबतच आधुनिकता आणि पारंपरिकतेची सांगड घालत विविध बोधपर गोष्टी, बौद्धिक सत्रे, बैठे खेळ, विनोद, मनोरे आदी उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमधील कल्पकता, सभाधीटपणा, वक्तृत्व कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित होताना दिसून आला.

उपप्राचार्य जाधव सर यांनी बौद्धिक सत्रातून शिक्षणाचे महत्त्व, जीवनमूल्ये व संस्कार याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बालकांना शिक्षणासोबतच योग्य संस्कार व दिशा मिळणे गरजेचे आहे. मोबाईल आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे बालकांच्या विचारक्षमतेवर परिणाम होऊ नये, यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बालकांना योग्य वयात योग्य दिशा मिळाल्यास ते कुटुंब, समाज व राष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देऊ शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या बालसभेत नर्सरी ते केजी-२ तसेच इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध गाणी, भाषणे, वादविवाद, वैयक्तिक मनोगत, नृत्य आदी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. चिमुकल्यांनी उत्स्फूर्तपणे आपले कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुधवत मॅडम यांनी केले. गायकवाड मॅडम यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डवले सर यांनी अध्यक्षीय भाषण केले.

विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शिकण्याची, व्यक्त होण्याची आणि आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळाल्याने बालसभा उत्साहात व आनंदात संपन्न झाली.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button