दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाची पणती!
मनोज दांडगे यांच्याकडून जामठी-शेकापूरमधील गरजू कुटुंबांना ४५० किराणा किट व दिवाळी फराळाचे वाटप

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाची पणती!
मनोज दांडगे यांच्याकडून जामठी-शेकापूरमधील गरजू कुटुंबांना ४५० किराणा किट व दिवाळी फराळाचे वाटप
‘स्वतःच्या आनंदात इतरांचाही आनंद शोधणारा माणुसकीचा दीप…!’
जामठी, दि. ५ नोव्हेंबर २०२६ : दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा चिखली विधानसभा अध्यक्ष मनोज दांडगे यांच्या वतीने जामठी व शेकापूर येथील गरजू कुटुंबांना ४५० किराणा किट व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. जामठी येथील व्यायामशाळेत आयोजित या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलता, माणुसकी आणि बांधिलकीचा सुंदर प्रत्यय आला.
या किराणा किटमध्ये साखर, खाद्यतेल, बेसन, मैदा, रवा, चिवडा, तुरीची डाळ, साबण आणि उटणे अशा दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश होता. दिवाळीच्या फराळासह या वस्तू गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. आर्थिक अडचणींमुळे सणाचा आनंद कमी होऊ नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच श्री. मंगेश तायडे पाटील होते. प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच श्री. बिलालभाऊ गायकवाड, उपसरपंच श्री. कौतिकराव नरोटे यांच्यासह गावातील राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, कृषी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व माता लक्ष्मी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. वत्सलाबाई दांडगे बहुउद्देशीय संस्था, जामठी यांच्या माध्यमातून गरजू कुटुंबांची माहिती संकलित करून नियोजनबद्ध पद्धतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे समन्वयक तथा ज्ञानदेवराव बापू दांडगे शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य श्री. संतोष डवले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
प्रास्ताविकात गणेशराव तायडे यांनी मनोज दांडगेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत ते गावासाठी अभिमानास्पद व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. प्रदेश सचिव निर्मला तायडे यांनी दांडगेच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करून त्यांना ‘देवरूपी व्यक्तिमत्त्व’ असे संबोधले. मनीषा उमेश दांडगे यांनी मनोज दांडगेच्या सामाजिक कार्याचा अभिमान व्यक्त करत त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून असेच समाजोपयोगी कार्य घडत राहो, अशा शुभेच्छा दिल्या. कु. गायत्री मनोज दांडगे यांनीही वडिलांचे सामाजिक कार्य संपूर्ण कुटुंबासाठी प्रेरणादायी असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी मनोज दांडगे यांनी उपस्थितांचे व लाभार्थी कुटुंबांचे आभार मानले. जामठी गावाशी आपले नाते हे केवळ राजकीय किंवा पदापुरते मर्यादित नसून ते प्रेम, जिव्हाळा आणि सामाजिक जबाबदारीतून निर्माण झालेले आहे, असे त्यांनी नमूद केले. गावाचा विकास आणि गरजू कुटुंबांना मदतीचा हात देणे ही आपली कायमची बांधिलकी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गावातील रस्ते, मोफत धान्य दळणाची सुविधा, स्मशानभूमी सुशोभीकरण, वॉटर फिल्टर मशीनचे वितरण, वाफेच्या मशीनचे वितरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, व्यायामशाळा, वाचनालय तसेच शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी आणि ISO मानांकनासाठी केलेले प्रयत्न अशा विविध कामांचा उल्लेख यावेळी करण्यात आला.
मनोजभाऊ दांडगे यांच्या सामाजिक कार्याला केवळ एका दिवसाच्या उपक्रमाची मर्यादा नसून गेल्या दहा वर्षांपासून दिवाळीच्या निमित्ताने विधवा, निराधार व गरजू महिलांना साडी-चोळी व फराळाचे वाटप करण्याची परंपरा त्यांनी जपली आहे. यंदाही ७ नोव्हेंबर रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या घरातही दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा सण नाही, तर दुसऱ्याच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याची संधी आहे. गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा मनोज दांडगे यांचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरला.



