पेनटाकळी धरणावर हजारो शेतकऱ्यांसह शिवसैनिकांचा धडक मोर्चा; आमदार सिद्धार्थ खरात आक्रमक!

पेनटाकळी धरणावर हजारो शेतकऱ्यांसह शिवसैनिकांचा धडक मोर्चा; आमदार सिद्धार्थ खरात आक्रमक!
धरणात मुबलक पाणीसाठा… मात्र शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनासाठी पाणी नाही! या अन्यायाविरोधात अखेर शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला. पेनटाकळी धरणातील पाणी तातडीने सिंचनासाठी सोडण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांचा भव्य मोर्चा थेट पेनटाकळी धरणावर धडकला.
मात्र, पोलिसांनी धरणाच्या प्रवेशद्वारावरच मोर्चा अडविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. धरणात पाणी उपलब्ध असताना शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी का दिले जात नाही? शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी अडवून ठेवण्याचे कारण काय? असे सवाल उपस्थित करत त्यांनी तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली.
दरम्यान, आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाकडून पालकमंत्र्यांसोबत तातडीने बैठक घेऊन पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच यासंदर्भात लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.या आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश आणि आमदार सिद्धार्थ खरात यांचा आक्रमक पवित्रा यामुळे पेनटाकळी धरणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय आता पालकमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणी कधी पोहोचते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



