बातमी

पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी शेतमजूर संकटात बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा आजाद समाज पार्टीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी शेतमजूर संकटात बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा
आजाद समाज पार्टीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पीक पाहणी व पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी : सुजित बांगर

बुलढाणा, दि. ८ सप्टेंबर : बुलढाणा जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी न लावल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुजित बांगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिके सुकून नेसतानाबूत झाली आहेत. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, औषधे आणि मशागतीवर मोठा खर्च केला आहे. मात्र पावसाअभावी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, खामगाव, नांदुरा, मलकापूर, मोताळा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार आणि बुलढाणा या सर्व तालुक्यांमध्ये तातडीने पीक पाहणी व पंचनामे करून वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

नुकसानग्रस्त सर्व पिकांना हेक्टरी भरीव नुकसानभरपाई द्यावी, पीक कर्ज व कृषी कर्जाबाबत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, पीकविमा नुकसानभरपाई तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, तसेच जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे प्रभावित गावांमध्ये शेतमजूर व कष्टकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते व आवश्यक कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शेतकरी व शेतमजुरांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आझाद समाज पार्टीच्या वतीने शेतकरी, कष्टकरी व शेतमजुरांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सुजित बांगर यांनी प्रशासनाला दिला आहे.

निवेदन देतेवेळी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुजित बांगर,जिल्हा नेते पंकज शेगोकार,काशिनाथ हावरे,संदिप अजने,हिरकन्या अजने,सुनीता बिलेवार,देविदास अजने, देवमन अजने,भीमराव अजने,विठ्ठल ठाकरे,अजाबराव जमाव,मंगेश कोल्हे,दिलीप जमाव,संतोष अजने यांचेसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button