बातमी

सिंदखेडराजा विकास आराखडा वेगाने पूर्ण करणार – सुधीर मुनगंटीवार* राजमाता जिजाऊ यांच्या टपाल तिकीटाचे अनावरण

  सिंदखेड राजा ही भूमी स्वराज्याची प्रेरणा देणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची ही जन्मभूमी आहे. या भूमीचा विकास करणे हे राज्य शासनाचे आद्यकर्तव्य आहे. यासाठी 260 कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. हा आराखडा वेगाने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
 
       सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, अॅड. आकाश फुंडकर, श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोस्ट मास्तर जनरल अदनान अहेमद आदी उपस्थित होते.
 
       श्री. मुनगंटीवार म्हणाले, विकास आराखडा मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी वेगाने प्रक्रिया करण्यात येत आहे. मात्र विकासकामे सुरू झाल्यानंतर नागरिकांनी यास विरोध करू नये. विकासकामांना सहकार्य करण्याची भूमिका नागरिकांनी घेतल्यास अधिक योग्स होईल. ही कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होण्यासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी सजगता बाळगावी. जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व घडविले. त्यांच्या विचारानुसारच राज्य कारभार चालविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
 
      पालकमंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, राज्याचा कारभार महान व्यक्तींच्या विचारावर सुरू आहे. त्यांच्या विचारांची जोपासना करण्याबरोबरच त्यांच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात येत आहे. शासन यास विशेष प्राधान्य देत आहे. विकास कामे वेगाने पूर्ण केली जातील. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रांचा विकास होण्यास मदत होईल.
 
      यावेळी आमदार डॉ. शिंगणे यांचे समयोचित भाषण झाले. रामदास कुरंगळ यांनी पोवाडा सादर केला. छगन झोरे लिखीत ‘राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले जन्माला यावे पुन्हा’ आणि दैनिक सकाळतर्फे प्रकाशित विशेष पुरवणीचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तत्पुर्वी श्री. मुनगंटीवार यांनी राजमाता जिजाऊं यांच्या जन्मस्थळी जाऊन अभिवादन केले.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button