बातमी
शिवजयंती सोहळ्यात आज दुग्धशर्करा योग..
सकाळी प्रेरणादायी व्याख्यान तर सायंकाळी शहारे आणणारा शाहीरीबाणा

शिवजयंती सोहळ्यात आज दुग्धशर्करा योग..
* सकाळी प्रेरणादायी व्याख्यान तर सायंकाळी शहारे आणणारा शाहीरीबाणा
बुलढाणा
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा २०२५च्या वतीने यंदा १४ फेब्रुवारीपासून सुरु झालेला ‘शिवसप्ताह’ रंगतदार होत असून, मंगळवार १८ फेबु्रवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या प्रा.विठ्ठल कांगणे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज व आजचा युवा’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. तर सायंकाळी याच मातीतला युवा शाहीर विक्रांतसिंह राजपूत यांचा ‘महाराष्ट्राचा शाहीरीबाणा’ हा अंगावर शहारे आणणारा कार्यक्रम सादर होणार आहे.
बुलढाणा येथे सार्वजनिक उत्सव शिवजयंती सोहळा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे. १४ फेब्रुवारी रोजी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे ‘शिवकिर्तन’ दणक्यात झाले. त्यानंतर दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम रंगत आहे. शनिवार १५ फेब्रुवारी रोजी गडकिल्ले स्पर्धा, रविवार १६ फेब्रुवारी रोजी पोवाडे स्पर्धा, सोमवार १७ फेब्रुवारी रोजी वेशभुषा स्पर्धा तर याचदिवशी जयंती सोहळास्थळी शिववाहतूक सेनेच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. मंगळवार १८ फेब्रुवारी रोजी वत्कृत्व स्पर्धा होणार आहे. तर मंगळवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता प्रा.विठ्ठल कांगणे यांचे प्रेरणादायी व्याख्यान अन् सायंकाळी ७ वाजता युवाशाहीर विक्रांतसिंह राजपूत यांचा ‘महाराष्ट्राचा शाहीरीबाणा’कार्यक्रम होणार आहे. यानंतर रात्री १० वाजता दिपोत्सव तर मध्यरात्री १२ वाजता शिवजन्मदिनाची सुरुवात आतिषबाजीने होणार आहे. या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती समिती बुलढाणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
* शिवजयंतीदिनी पहाटेपासून कार्यक्रम..
१९ फेब्रुवारी या शिवजयंतीदिनी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज मंदिरावर महापूजा, तिथून पालखीने शिवस्मारकावर शिवपूजन. नंतर सकाळी ७.३० वाजता जिजामाता प्रेक्षागारावरुन शहरातून रॅलीला सुरुवात, तर सकाळी ९.३० वाजता जिजामाता प्रेक्षागारावर समारोप. तिथेच आभासी पध्दतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी जयंती सोहळ्यानिमित्त शिवसंबोधन करतील. तर जिजामाता प्रेक्षागारापूढे ‘शिवनेरी सभास्थळी मुख्य कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. यावेळी केंद्रीय मंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जि.प.मुकाअ.यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तथा बुलढाणा शहरातील शिवप्रेमींची प्रामुख्याने उपस्थिती राहिल. सायंकाळी ४ वाजता ‘शिवस्मारक’ संगम चौक ते ‘भारतमाता’ कारंजा चौक अशी सांस्कृतिक शोभायात्रा काढण्यात येईल!



