लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार : आ.सिद्धार्थ खरात
भालेगावातील महामानवांच्या तिन्ही पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी आमदार निधीतून 15 लक्ष निधी देणार

लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार : आ.सिद्धार्थ खरात
भालेगावातील महामानवांच्या तिन्ही पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी आमदार निधीतून 15 लक्ष निधी देणार
मेहकर : समृद्ध ऐतिहासिक वारसा तसेच पुरोगामी परंपरा लाभलेले भालेगाव हे गाव आहे. गावकऱ्यांनी भरभरून मतदान करून मला विधानसभेत पाठवले. मी जर आज उपस्थित राहू शकलो नसतो, तर खूप मोठी चूक झाली असती. भालेगाव वासियांच्या प्रेमाने भारावून गेलो असून, लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार, असे प्रतिपादन आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले.
गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी भालेगाव वासियांच्या वतीने आमदार सिद्धार्थ खरात यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, संत वारकरी महापुरुष यांचा मिलाफ असणारे भालेगाव आहे. संकटकाळी भालेगाव माझ्या पाठीशी उभे राहिले, याचा मला अभिमान आहे. भालेगाव – नांद्रा नदीवरील पूल, शेंद्रा ते नांद्रा रस्ता , नाला आणि नदी खोलीकरण यासह गावकऱ्यांच्या पंधरा मागण्या आहेत. या सर्व मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही, आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले. मेहकर मतदारसंघ पंधरा वर्षाच्या पारतंत्र्यातून आता स्वतंत्र झाला असून यापुढेही या मतदारसंघाचे स्वतंत्र कायम राहणार असल्याचेही आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ए टी निकम (माजी संचालक, बु जी केंद्रीय बँक), तंटामुक्ती अध्यक्ष कुंडलिकराव धोंडगे, माजी पोलीस पाटील भीमरावजी निकम , पोलीस पाटील मधुकर निकम, सरपंच पती प्रविण निकम, उपसरपंच मंगल निकम, ग्रामपंचायत सदस्य शरद धोंडगे,गजानन निकम, हिम्मतरावं गवई, बेबीताई दाभाडे, संदीप पुरी, योगेश निकम, किशोर असरमोल, संजय निकम, सुरेश धोंडगे, रामकिसन निकम, महादू बोरकर,रुपराव धोंडगे, देविदास गवई, सर्जेराव पैठणे, केशव असरमोल,मधुकर निकम, भगवान पुरी, रघुनाथ धोंडगे, सुकदास धोंडगे, श्रीकिसन धोंडगे, समाधान धोंडगे,भागवत धोंडगे,रवी दाभाडे, ज्ञानेश्वर शेगोकार, दत्ता शेगोकार, डॉ. सार्थ खरात,संजय निकम ,शेषराव धोंडगे, प्रा. रवींद्र सावळे, प्रा.राजेंद्र धोंडगे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकऱ्यांची उपस्थिती होती.
महापुरुषांच्या स्मारकासाठी १५ लाखांचा निधी
भालेगावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी तसेच सौंदर्यीकरण्यासाठी प्रत्येकी पाच लाख असा १५ लाखांचा निधी अर्थसंकल्पानंतर एप्रिल – मे महिन्यात देणार असल्याचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले.
दुग्ध व्यवसायाला चालना देणार
मेहकर मतदारसंघात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे कृषी पुरक उद्योगांची कास धरण्यासाठी शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी सहकार्य करणार असल्याचे आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले. दुग्ध व्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आगामी काळात दोन ते तीन दुधाळ जनावरे उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले.



