नारीशक्तीचं ठरलंय, परिषद तर घ्यायचीच..*. *गोंदिया येथे लवकरच विधवा महिला परिषद!

*नारीशक्तीचं ठरलंय, परिषद तर घ्यायचीच..*.
*गोंदिया येथे लवकरच विधवा महिला परिषद!*
बुलढाणा
विधवा व एकल महिलांसाठी मानस फाउंडेशनच्या माध्यमातून बुलढाण्यात चळवळ सुरू झाली. पाहता पाहता ही चळवळ आता राज्य स्तरावर जात आहे. गोंदिया येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या भगिनींनी प्रा. डी एस लहाने यांना विधवा महिला परिषदे साठी निमंत्रण दिले होते. त्यावरून प्रा. लहाने यांनी नुकतीच गोंदिया येथे भेट देत चर्चा केली.यावेळी गोंदिया शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर प्रतिष्ठित महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या. मे च्या शेवटच्या आठवड्यात गोंदियात विधवा महिला परिषद घेण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले आहे. त्यामुळे मानस फाउंडेशनच्या कार्याकक्षा आता राज्यस्तरावर विस्तारत आहे.
बुलढाणा येथे विधवा महिलांसाठी सुरू झालेले कार्य गोंदिया येथील भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक भावनाताई कदम यांना सोशल मीडिया द्वारे कळले. महिलांविषयी सुरू असलेली ही चळवळ त्यांना भावली. त्यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर महिलांशी याबाबत चर्चा केली व महिलांनी प्रा. लहाने यांना भेटीसाठी विनंती केली. लहाने यांच्यासाठी हा सुखद धक्का होता.त्यावरून डी एस लहाने यांनी चार मे रोजी गोंदिया गाठले. भावनाताई कदम यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. तुला सुरू असलेला उपक्रम गोंदिया जिल्ह्यातही आपण राबू असा आशावाद भावनाताई कदम यांनी व्यक्त केला.एकल महिला परिषद घेण्याविषयी त्यांनी पुढाकार घेत उपस्थित भगिनींना आवाहन केले असता सर्व महिलांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला. महिलांचे दुःख महिला जाणून घेऊ शकतात. महिला किती प्रगत झाली, पुढारली तरी कौटुंबिक जबाबदाऱ्या विशेषत्वाने तिच्याच माथी पडतात व या जबाबदारीच्या ओझ्या खाली तिला नेहमीच गुरफटून राहावे लागते. पती निधनानंतर तर महिला असहाय होऊन जाते. शिवाय सामाजिक रीती, परंपरा तिच्या मुळावर उठतात. त्यामुळे या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन यावेळी प्राध्यापक लहाने यांनी केले असता मे च्या शेवटच्या आठवड्यामध्ये गोंदिया शहरांमध्ये एकल महिलांसाठी विधवा परिषद घ्यायचं निर्धारित करण्यात आले.कार्यक्रमाला शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या विविध सामाजिक, राजकीय पक्षांच्या पदाधिकारी महिला उपस्थित झाल्या होत्या. मानस फाउंडेशन चे कार्य हे विधवा महिलांसाठी प्रेरक असल्याच भावनाताई कदम बोलतांना म्हणाल्या. असे उपक्रम राज्यभर कसे राबवता येईल यासाठी संघटित प्रयत्नाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. गोंदिया जिल्ह्यात हा उपक्रम जोमाने राबवणार असल्याचा मनोदय त्यांनी बोलताना व्यक्त केला.



