मनोज दांडगे यांची समाजसेवेची परंपरा कायम; २२ ते २८ जुलैदरम्यान मासरूळ सर्कलमध्ये भव्य आरोग्य शिबिरांची मालिका

मनोज दांडगे यांची समाजसेवेची परंपरा कायम; २२ ते २८ जुलैदरम्यान मासरूळ सर्कलमध्ये भव्य आरोग्य शिबिरांची मालिका
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा चिखली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष मनोज दांडगे यांच्या पुढाकारातून २२ जुलै ते २८ जुलै या कालावधीत मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमधील विविध गावांमध्ये भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मनोज दांडगे यांनी यापूर्वीही मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये अनेक वेळा अशा प्रकारची आरोग्य शिबिरे आयोजित करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. या शिबिरांच्या माध्यमातून सुमारे साडेतीन हजार गरजू रुग्णांना विविध शस्त्रक्रियांचा लाभ मिळवून देण्यात आला असून, अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी हा उपक्रम मोठा आधार ठरला आहे.
यंदाच्या शिबिरांमध्ये हृदयरोग, 2D-इको, ईसीजी, मधुमेह, रक्तदाब, नेत्ररोग, नाक-कान-घसा, स्त्रीरोग, अस्थिरोग, जनरल मेडिसिन तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. आवश्यक असलेल्या रुग्णांची पुढील उपचार व शस्त्रक्रियांसाठी नोंदणीही करण्यात येत आहे.
या शिबिरांची सुरुवात २२ जुलै रोजी मासरूळ येथून होत असून त्यानंतर २४ जुलै रोजी जामठी, २५ जुलै रोजी जनुना, २७ जुलै रोजी वरूड आणि २८ जुलै रोजी कुंढेफळ येथे शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. प्रत्येक ठिकाणी सकाळी १० वाजता शिबिरास प्रारंभ होणार आहे.
“कोणताही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये” या सामाजिक भावनेतून मनोज दांडगे सातत्याने जनहिताचे उपक्रम राबवत असून, त्यांच्या या समाजोपयोगी कार्याचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे. मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



