बातमी

शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारण व वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार

एचडीएफसी बँकेच्या निधीतून जलसुरक्षा, पाणलोट विकास, हवामानपूरक शेती व उपजीविका वृद्धी उपक्रम राबविणार

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात सर्वांगीण, शाश्वत आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन व वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत विविध विकास प्रकल्पांसाठी एचडीएफसी बँकेमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमासाठी आमदार श्वेता महाले यांचे सहकार्य लाभले आहे.

या प्रकल्पांतर्गत जलसुरक्षा, एकात्मिक पाणलोट विकास, नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन, हवामान बदलास अनुकूल शेतीपद्धती, उपजीविका वृद्धी, स्थानिक संस्थांचे बळकटीकरण आणि ‘जल तारा’ या उपक्रमांवर विशेष भर देण्यात येणार आहे. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध नैसर्गिक संसाधने आणि स्थानिक समुदायांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांचे नियोजन व अंमलबजावणी केली जाणार आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांशी या उपक्रमांची सांगड घालून उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. ग्रामस्तरावरील संस्थांची क्षमता वाढविणे, जलस्रोत व नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, हवामानपूरक शेतीपद्धतींचा प्रसार आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी बळकट करण्यासाठी स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे.

या प्रसंगी मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता यतीन कोठावळे, वरिष्ठ अभियंता निखिल धाडवे तसेच एचडीएफसी बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कामासाठी मृद व जलसंधारण उपविभाग, चिखलीचे उपअभियंता शुभम चांदा व कनिष्ठ अभियंता मनोज देठे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

जिल्हा प्रशासनाचा समन्वय, एचडीएफसी बँकेचे आर्थिक सहकार्य आणि WOTR चे तांत्रिक ज्ञान व प्रकल्प अंमलबजावणीचा अनुभव यांच्या समन्वयातून चिखली तालुक्यात शाश्वत विकास उपक्रमांना गती मिळणार आहे. लोकसहभागातून जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि ग्रामीण भागातील उपजीविका बळकट करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button