बातमी
साठ वर्षीय वृद्ध महिलेचे पतसंस्थेत जमा असलेले ४ लाख रुपये मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण * आज उपोषणाचा 4 था दिवस

साठ वर्षीय वृद्ध महिलेचे पतसंस्थेत जमा असलेले ४ लाख रुपये मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
* आज उपोषणाचा 4 था दिवस
पतीच्या नावे पतसंस्थेत असलेली 4 लाखांची रक्कम वारस म्हणून देण्यात यावी, या मागणीसाठी सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन येथील 60 वर्षीय वृद्ध महिलेने 26 डिसेंबर 2023 पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे. आज या उपोषणाचा 4 था दिवस उजाडला आहे. परंतु अद्यापही प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही.
सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन येथील 60 वर्षीय सिंधुबाई आत्माराम जाधव यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, पतीचे कोरोना आजारामुळे २०२१ मध्ये निधन झाले आहे. 15 वर्षे मोलमजुरी करून पतीने ४ लाख रुपये बुलडाणा अर्बनच्या शेंदुर्जन शाखेत ठेवले होते. आज रोजी त्या खात्यात ४ लाख ४ हजार ९३५ रुपये जमा आहेत. या रकमेला वारस म्हणून पतीने माझे नाव लावले होते. त्यानुसार वारस हक्का प्रमाणे पैसे मिळण्यासाठी पतसंस्थेकडे अर्ज केला. कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु शाखा व्यवस्थापकाने रक्कम दिली नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी तसेच शाखेत जमा असलेली रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी सिंधुबाई जाधव या वृध्द महिलेने मागील चार दिवसांपासून उपोषणास सुरूवात केली आहे.
तरी या मागणीकडे वरिष्ठांनी लक्ष घालून मला न्याय मिळवून द्यावे असेही या वृध्द महिलेने एशिया मंच च्या प्रतिनिधीशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.



