विशेष बातमी

अस्थिविसर्जन कार्यक्रमात शाळेला मदत व देहदानाचाही संकल्प.. सर्पमित्र नंदूआप्पा यांचा सामाजिक आदर्श!

अस्थिविसर्जन कार्यक्रमात शाळेला मदत व देहदानाचाही संकल्प..

सर्पमित्र नंदूआप्पा यांचा सामाजिक आदर्श!

बुलडाणा

मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. मृत्यूनंतर शरीराची राख होते.मात्र मृत्यूनंतर अवयव रुपी ऊरावे व इतरांच्या कामी हा देह पडावा या उदात्त हेतूने केळवद ता.चिखली येथील नंदू आप्पा बोरबळे यांनी आईच्या अस्थि विसर्जन कार्यक्रमातच देहदानाचा संकल्प केला. केवळ देहदानाचा संकल्पच केला नाही तर गावातील शाळेला भरघोस अशी आर्थिक मदतही दिली. आईच्या अस्थी विसर्जन कार्यक्रमातील आप्पाजींचे सामाजिकपण सध्या चर्चेचा विषय झाले आहे.

आईचे निधन हे प्रत्येकाच्या आयुष्यातील दुःखद घटना,प्रत्येकाच्या जीवनातील सुखदुःखाचा साक्षीदार म्हणजे आई. नंदू आप्पा बोरबळे यांच्या मातोश्री राधाबाई बोरबळे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम 15 एप्रिल रोजी केळवद येथे होता. या कार्यक्रमात कर्मकांडाला फारसा वाव न देता थोडक्यात विधी त्यांनी आटोपले. नसा नसात भरलेले सामाजिकपण आणि प्रवाहाच्या बाहेर जाऊन काहीतरी करण्याची वृत्ती नंदू आप्पा यांनी जोपासली आहे. विषारी सापाला हात लावणे म्हणजे मृत्यूला हात लावणे.मोठी जोखीम, आप्पाजी हे काम दिवसाआड करतात. सर्पमित्र असल्याने अनेक विषारी साप पकडून त्यांना जंगलात सोडून देतात. गोरगरीब असेल, गावातील कुणीही असेल हा सेवाभाव त्यांनी कितीतरी वर्षापासून जोपासला आहे.दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची वृत्ती माणसाला गप्प बसू देत नाही. आईचे निधन झाले या दुःखद प्रसंगातही त्यांनी आपल्या सामाजिकतेचा परिचय देत गावातील संभाजी विद्यालयास अकरा हजार रुपये देणगी दिली. तर आपल्या शरीराचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी व्हावा या हेतूने देहदानाचा संकल्प सोडला. यावेळी संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुखराज शिंदे व शिक्षक गजानन धोंडगे यांच्याकडे निधी सुपूर्त करण्यात आला. शरद कला महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णुपंत पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. गजेंद्र निकम,पत्रकार गणेश निकम , पत्रकार राम हिंगे, अमोल बोरबळे,शिवसेना नेते नंदू भाऊ कराळे , माजी सभापती जगन नाना,नारायण वाणी,पवन महाराज, डॉ.आकाश सदावर्ते,निलेश सदावर्ते,सनी पांढरे, मनोहर पवार,नंदिनी बोरबळे आदीं उपस्थिती होते.

 

सामाजिक बदलासाठी छोटे छोटे प्रयत्न देखील कामी पडतात. त्याची सुरुवात कुठेतरी करावी लागते. एकदा का ते समाजाच्या पचनी पडले की मग स्वीकारले देखील जातात.आप्पाजींनी केलेला प्रयत्न सामाजिक दिशा दाखवणारा असल्याने नक्कीच कौतुकास्पद ठरला आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button