बातमी

बुलढाण्यात होणार बामसेफचे 2 दिवसीय राज्य अधिवेशन चित्रपट निर्माते सुनील शेळके यांच्या हस्ते होणार उद्घाटन

बामसेफच्यावतीने भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा, संवर्धन राष्ट्रव्यापी महाजनजागरण अभियानांतर्गत ३९ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन २२ व २३ ऑगस्ट रोजी बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब, येथे आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाचे उदघाटन चित्रपट निर्माता तथा माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांच्या हस्ते होणार आहे.
        अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २२ ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीयकरणाचे ठाम आवाहन, खासगीकरणावर हवे नियंत्रण ; म्हणजेच राष्ट्रीयकरणाकडून लोकशाही राज्य समाजवादाकडे वाटचाल’ या विषयावर उद्घाटन सत्र व विशेष प्रबोधन सत्र होणार आहे.या अधिवेशनाचे उद्घाटन माजी उपजिल्हाधिकारी तथा सत्यशोधक चित्रपट निर्माते सुनील शेळके यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे उपस्थित राहणार आहेत. सत्रात बामसेफच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य कविता मडावी या वक्त्या असुन अध्यक्षस्थानी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय मोहिते राहणार आहेत. या सत्रात सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व, खासगीकरणामुळे निर्माण होणारी सामाजिक व आर्थिक विषमता, सार्वजनिक संसाधनांवरील नियंत्रण आणि सामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने राष्ट्रीयकरणाची आवश्यकता यावर विचार मांडण्यात येणार आहेत.
         दुसऱ्या दिवशी २३ ऑगस्ट रोजी ‘जातनिहाय जनगणना रोखण्यासाठी रचल्या जाणाऱ्या ब्राह्मणवादी डावपेचांविरुद्ध तातडीच्या राष्ट्रव्यापी जनआंदोलनाची गरज – मूलनिवासींची एकच गर्जना – ओबीसी जातनिहाय जनगणना!’ या विषयावर विशेष जनप्रबोधन सत्र आयोजित करण्यात आले आहे. या सत्रात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींची जातनिहाय जनगणना होत असताना ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना का झाली नाही, जातनिहाय जनगणनेची आवश्यकता काय आहे, सामाजिक न्यायाच्या धोरणांसाठी जातनिहाय आकडेवारीचे महत्त्व काय आहे आणि ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी व्यापक जनआंदोलनाची गरज यावर प्रबोधन करण्यात येणार आहे.
* व्यापक विचारमंथन होणार :
      जातनिहाय जनगणना, वाढते खासगीकरण, राष्ट्रीयकरण आणि विकासातील सामाजिक-आर्थिक-राजकीय आव्हाने आणि सामाजिक न्यायाच्या विविध प्रश्नांवर व्यापक विचारमंथन करण्यात येणार आहे. या अधिवेशनास बामसेफचे राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती बामसेफ बुलढाणा जिल्हा युनिटने दिली.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button