बातमी

गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांसाठी समन्वयाने काम करा : उपसंचालक सुशीलकुमार वाकचौरे यांचे आरोग्य विभागाला निर्देश

*गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांसाठी समन्वयाने काम करा : उपसंचालक सुशीलकुमार वाकचौरे यांचे आरोग्य विभागाला निर्देश*

बुलढाणा, दि. २५ जिल्ह्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, तत्पर आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभाग, अकोला मंडळाचे उपसंचालक सुशीलकुमार वाकचौरे यांनी दिले.

समुदाय आरोग्य अधिकारी व्यक्तिमत्व तथा कौशल्य विकास कार्यशाळेचे उद्घाटन उपसंचालक सुशीलकुमार वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला.

आयुष्मान आरोग्य मंदिरांमार्फत नागरिकांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच राज्य शासनाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून गावपातळीवरील आरोग्य निर्देशकांमध्ये सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या कामकाजाचाही आढावा घेतला.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (NUHM) शहरी भागातील नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, विविध आरोग्य उपक्रम आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीबाबतही चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत (NTEP) क्षयरोग शोध, निदान, उपचार, रुग्णांचे समुपदेशन तसेच निक्षय पोषण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा, उपलब्ध आरोग्य सुविधा तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या कामकाजाची माहिती घेताना उपसंचालकांनी आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. हरी पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे, जिल्हा प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा पाटील, साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चौहान यांच्यासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, कार्यक्रम समन्वयक, वैद्यकीय अधिकारी तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे अधिकारी उपस्थित होते.

‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन उपसंचालक वाकचौरे यांनी केले.
00000

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button