फायनान्सची मनमानी वसुली थांबवा : भैय्यासाहेब पाटील आक्रमक
शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या पतसंस्था फायनान्स कंपन्यांना शिवसेना शेतकरी परिषदेचा निर्वाणीचा इशारा

फायनान्सची मनमानी वसुली थांबवा : भैय्यासाहेब पाटील
प्रतिनिधी | बुलडाणा
नैसर्गिक संकटे, नापिकी, शेतीमालाचे घसरलेले दर, आर्थिक अडचणींनी शेतकरी त्रस्त असताना फायनान्स कंपन्या व काही पतसंस्था कर्जवसुलीच्या नावाखाली कथित पिळवणूक करत आहेत. कर्जहप्त्यांसाठी धमकावणे, मानसिक त्रास देणे, अवाजवी दबाव टाकणे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. शेतकऱ्यांची पिळवणूक कराल तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा शिवसेना शेतकरी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी दिला.
बुलडाणा येथील विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ही परिषद २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान झाली. पाटील यांनी फायनान्स कंपन्या व पतसंस्थांच्या कथित मनमानी वसुली पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्ज घेणे ही शेतकऱ्यांची हौस नाही. शेतीचा खर्च भागविण्यासाठी अनेकदा आर्थिक संस्थांकडे जावे लागते, असे ते म्हणाले. नैसर्गिक आपत्ती किंवा शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने हप्ते थकल्यास माणुसकीने वागणे अपेक्षित असते. मात्र काही वसुली प्रतिनिधी दबावाचे मार्ग अवलंबतात, असा आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता वसुलीसाठी तगादा लावणे, अपमानास्पद वागणूक देणे, धमकावणे. ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जवसुलीला विरोध नाही. वसुलीसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब व्हावा. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला धक्का देणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीतील त्रुटी व तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. अतिवृष्टी व दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार ५ हजारांची मदत दिवाळीपूर्वी वितरित करावी, असे ते म्हणाले. पीककर्ज तातडीने वितरित करावे. कर्जमाफी योजनेतील त्रुटी दुरुस्त करून गावनिहाय लाभार्थी यादी जाहीर करावी, अशा मागण्या शासन दरबारी केल्याची माहिती त्यांनी दिली.



